महापौरांच्या हस्ते धनादेशांचे वाटप
प्रतिनिधी / सांगली
कोविड संकटाच्या काळात कर्तव्य बजावत असताना कोविड संसर्ग झल्याने महापालिकेच्या ५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांव्ही मदत देण्याची घोषणा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केली होती. शुक्रवारी महापौर गीता सुतार यांच्या हस्ते मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले. यावेळी आयुक्त कापडणीस, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, संघर्ष सफाई कामगार संघटनेकडून डॉ. महेशकुमार कांबळे आदी उपस्थित होते.
महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा घट्ट झाला होता. कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेकडून अनेक प्रतिबंधात्मक योजना राबविण्यात आल्या. त्यासाठी आयुक्त कापडणीस यांच्यासह त्यांचे सर्व अधिकारी, कर्मचारी अहोरात्र राबत होते. कोरोनाशी दोन हात करत असताना मनपा क्रीडा अधिकाऱ्यांसह पाच जणांचे कोरोनाने बळी घेतले. त्यांच्या वारसांना मदत देण्याची मागणी संघर्ष सफाई कामगार संघटनेकडून डॉ. महेशकुमार कांबळे यांनी आयुक्त कापडणीस, महापौर सुतार यांच्याकडे केली होती.
त्यांच्या मागणीची दखल घेत आयुक्त कापडणीस यांनी मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. शुक्रवारी महापौर सुतार यांच्या हस्ते मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदतीचे धनादेश देण्यात आले. या कार्यक्रमास सहायक आयुक्त सहदेव कावडे, आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे, वित्त व लेखाधिकारी स्वप्नील हिरगुडे, आस्थापना अधिकारी अनिल चव्हाण, नवीन संबोधी, प्रियांका जाधव, अश्विनी पोरे, सचिन सागावकर, संगय्या मठड आदी उपस्थित होते.