- दैनंदिन रुग्ण वाढीत भारताने अमेरिकेला टाकले मागे
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात आलेल्या दुसऱ्या कोरोनाच्या लाटेने जगातील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. भारताने दैनंदिन रुग्ण वाढीत अमेरिकेला देखील मागे टाकले आहे. कोरोनाची दररोज वाढणारी रुग्ण संख्या आणि मृत्यूच्या संख्येने भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. एका दिवसात मिळणाऱ्या संख्येने गुरुवारी 3.14 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर 2 हजार पेक्षा अधिक रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यापूर्वी एका दिवसात सर्वात जास्त रुग्ण अमेरिकेत आढळले होते. हे रेकॉर्ड भारताच्या नावावर जमा झाले आहे.
आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशात मगील 24 तासात 3 लाख 14 हजार 835 नवे रुग्ण आढळून आले. याबरोबरच देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 59 लाख 30 हजार 965 वर पोहोचली आहे. गुरुवारी आता पर्यंतच्या सर्वाधिक म्हणजेच 2,104 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 1 लाख 84 हजार 657 एवढी झाली आहे.
काल देशात 1,78,841 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 1 कोटी 34 लाख 54 हजार 880 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 13 कोटी 23 लाख 30 हजार 644 जणांना लस देण्यात आली आहे. सध्या देशात 22 लाख 91 हजार 428 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत देशात 27 कोटी 27 लाख 05 हजार 103 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 16 लाख 51 हजार 711 कोरोना चाचण्या बुधवारी (दि. 21 एप्रिल 2021) एका दिवसात करण्यात आल्या.