जिल्हय़ातील 11 तर परजिल्हय़ातील एकाचा मृत्यू :
प्रतिनिधी/ सांगली
जिल्हय़ात सोमवारी नवीन 156 रूग्ण वाढले आहेत. तर 116 जण कोरोनामुक्त झाले. महापालिका क्षेत्रात 105 तर ग्रामीण भागात 51 रूग्ण वाढले आहेत. 12 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील 11 जणांचे तर परजिल्हय़ातील एकाचा मृत्यू झाला आहे.
महापालिकाक्षेत्रात 105 रूग्णांची वाढ
महापालिका क्षेत्रात सलग तिसऱया दिवशीही 100 पेक्षा अधिक रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. ही वाढती रूग्णसंख्या चिंताजनक बनत चालली आहे. रूग्णांच्यावर उपचार करण्यासाठी सध्या महापालिका क्षेत्रात रूग्णालयात उपचारासाठी बेड मिळत नाहीत. त्यामुळे या वाढत्या रूग्णसंख्येला आळा कसा घालायचा याचाच विचार महापालिकेकडून होत चालला आहे. सांगली शहरात 59 तर मिरज शहरात 46 नवे रूग्ण वाढले आहेत. महापालिकेने मात्र यातील ज्या रूग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत तसेच सौम्य लक्षणे आहेत त्यांना होम आयसोलेशन केले आहे. तसेच ज्यांना घरात सोय करता येत नाही त्यांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. पण ज्या रूग्णांना कोरोनाचा अधिक त्रास होत आहे. त्या रूग्णांना मात्र हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सांगलीत विश्रामबाग, गावभाग, खणभाग, शंभर फुटी रोड, शामरावनगर, हनुमाननगर, तसेच विविध उपनगरीय भागातील रूग्ण वाढले आहेत. मिरज शहरात रूग्ण हे गावठाणसह उपनगरीय भागात वाढले आहेत. सांगली महापालिका क्षेत्रात एकूण कोरोना रूग्णांची संख्या तीन हजार 07 झाली आहे.
ग्रामीण भागात 51 रूग्ण वाढले
जिल्हय़ातील ग्रामीण भागात 51 रूग्ण वाढले आहेत. यामध्ये आटपाडी तालुक्यात 15, जत तालुक्यात तीन, कवठेमहांकाळ तालुक्यात 10 रूग्ण वाढले आहेत. मिरज तालुक्यात मात्र रूग्ण वाढतच चालले आहेत. याठिकाणी 14 रूग्ण वाढले आहेत. तर तासगाव तालुक्यात तीन, वाळवा तालुक्यात सहा रूग्ण वाढले आहेत. असे एकूण 51 रूग्ण वाढले आहेत.
जिल्हय़ात 11 जणांचे मृत्यू
जिल्हय़ात 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील सहा व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 85 वर्षीय व्यक्ती, तसेच 85 आणि 62 वर्षीय महिलेचा कारोना रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. तर 80 आणि 40 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. 69 वर्षीय व्यक्तीचा विवेकानंद रूग्णालयात मृत्यू झाला. मिरज शहरातील 77 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मिरजेच्या कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला आहे. तर दुधगाव येथील 48 वर्षीय व्यक्तीचा कोरोना हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तासगाव शहरातील 48 वर्षीय व्यक्तीचा कुल्लोळी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तासगाव तालुक्यातील कौलगे येथील 60 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला. वाळवा तालुक्यातील कापूसखेड येथील 40 वर्षीय व्यक्तीचा घाटगे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या 11 जणांच्या मृत्यूने जिल्हय़ात कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या आता 156 झाली आहे. दरम्यान, परजिल्हय़ातील एकाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हय़ातील शिरोळ येथील 51 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
116 रूग्ण कोरोनामुक्त
जिल्हय़ात सोमवारी 116 जण कोरोनामुक्त झाले आहेत. या सर्वांच्यावर दहा दिवस कोरोनाचे पूर्ण उपचार झाल्यानंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाचे मोठय़ाप्रमाणात रूग्ण बरे होत असल्याने कोरोनाने बरे झालेल्या एकूण रूग्णांची संख्या आता दोन हजार 156 झाली आहे.
उर्वरित कैद्यांचा अहवाल येणे बाकी
जिल्हा कारागृहातील 150 कैद्यांचे तीन दिवसापूर्वी स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील 85 अहवाल आले आहेत. त्यामध्ये 40 जण बाधित तर 45 जण निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित 65 जणांचे अहवाल अद्यापही प्रतीक्षेत आहेत. आज अखेर एकूण जिल्हा कारागृहातील 121 कैदी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.