न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी दिली कबुली, – कधीच संपणार नाही विषाणूचे अस्तित्व
वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
न्यूझीलंडने कोरोना महामारीसंबंधी एक मोठे विधान केले आहे. पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी उर्वरित देशांप्रमाणेच या जागतिक महामारीपासून पूर्णपणे मुक्तता मिळविली जाऊ शकत नसल्याचे मान्य केले आहे. आर्डर्न यांनी ऑकलंडमध्ये लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली आहे. महामारीच्या प्रारंभी न्यूझीलंडने कठोर लॉकडाउन लागू करून आणि अन्य पावले उचलून विषाणूच्या फैलावावर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला होता.
न्यूझीलंडची ही रणनीति आतापर्यंत 50 लाख लोकसंख्या असलेल्या देशासाठी उपयुक्त ठरली होती. देशात संक्रमणापासून 27 लोकांचा मृत्यू झाला असल्याचे आर्डर्न यांनी म्हटले आहे.
अन्य देशांमध्ये बळींची संख्या वाढत असताना आणि लोकांवर निर्बंध असताना न्यूझीलंडचे लोक स्वतःच्या कार्यस्थळी, शाळा आणि स्टेडियममध्ये जात होते. पण ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलियातून आलेल्या एका व्यक्तीद्वारे डेल्टा व्हेरियंट विषाणूचा फैलाव झाल्यावर चित्र पूर्णपणे बदलल्याचे पंतप्रधान म्हणाल्या.
डेल्टा विषाणूचे संक्रमण समोर आल्यावर देशात अत्यंत कठोर निर्बंध लागू करण्यात आले होते. पण संक्रमण पूर्णपणे रोखण्यासाठी ते पुरेसे नव्हते. देशात सोमवारी 29 नवे रुग्ण समोर आल्यावर बाधितांची संख्या वाढून 1300 पेक्षा अधिक झाली आहे.
दीर्घकाळापर्यंत कठोर निर्बंध लागू करूनही महामारी पूर्णपणे संपलेली नसल्याचे स्पष्ट आहे. पूर्वी संक्रमण पूर्णपणे रोखणे महत्त्वाचे होते, कारण तेव्हा आमच्याकडे लस नव्हती. पण आमच्याकडे अनेक लसी आहेत, आम्ही आमचे धोरण बदलू शकतो असे त्यांनी म्हटले आहे.