कोरोना महामारीच्या प्रारंभापासूनच सर्व लोक त्याच्यापासून बचावाचे प्रयत्न करत आहेत. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेसह अनेक उपायांवर भर दिला जात आहे. याचदरम्यान अनेक उपचार चर्चेत आले आहेत. अशाच एका पद्धतीचा वापर करणारे ल्युक विलियमसन यांनी स्वतःला विषाणूपासून वाचविण्याच्या नादात नकळतपणे नवी समस्या ओढवून घेतली आहे. परंतु आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
इंग्लंडचे रहिवासी असलेले ल्युक यांनी विषाणूपासून बचावासाठी दररोज पाणी पिण्याचे प्रमाण दुप्पट केले होते. सर्वसाधारणपणे 1-2 लिटर पाणी माणसासाठी पुरेसे असते. परंतु ल्युक दररोज 4-5 लिटर पाणी पित होते. त्यांनी हा नियम अनेक दिवसांपर्यंत पाळला. त्यांच्या या दिनक्रमामुळे प्रकृती बिघडून ते जमिनीवरच कोसळले. 34 वर्षीय ल्युक हे सरकारी कर्मचारी आहेत.
संध्याकाळी आंघोळ करताना ल्युक बाथरुममध्येच कोसळले. टाळेबंदीमुळे शेजाऱयांची मदत घेता आली नाही. रुग्णवाहिकेला पाचारण केले असता ती 45 मिनिटांनी दाखल झाली. रुग्णवाहिका येण्याच्या 20 मिनिटांपूर्वीपर्यंत ते बेशुद्ध होते अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे.
अचानक कोसळल्याने ल्युक बेशुद्ध झाले होते, त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले होते. तपासणीत ल्युक यांच्या शरीरात अधिक पाणी पिल्याने मिठाची पातळी खूपच कमी झाल्याचे डॉक्टरांना आढळून आले. यादरम्यान त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. प्रकृती खूपच बिघडल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवावे लागले होते.