ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जगातील सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत सहाव्या स्थानावर आहे. मागील आठवड्यात नवव्या स्थानावर असलेला भारत आता इटलीसह अन्य देशांना मागे टाकत सहाव्या क्रमांकावर पोहचला आहे.
भारतात मागील 24 तासात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी 9971 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 287 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 2 लाख 46 हजार 628 वर पोहचली असून, मृतांची संख्या 6929 एवढी आहे.
सध्या देशात 1 लाख 20 हजार 406 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 लाख 19 हजार 293 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशातील कोरोना रुग्णांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात 82 हजार 968 रुग्ण आढळले आहेत. दिल्ली 27 हजार 654, तामिळनाडूत 30 हजार 152, गुजरातमध्ये 19 हजार 592, मध्यप्रदेश 9228, आंध्र प्रदेश 4510, बिहार 4915, राजस्थान 10 हजार 333, उत्तरप्रदेश 9733 तर पश्चिम बंगालमध्ये 7738 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.