उपचार सुरू असताना बाथरूममधून पळाला आरोपी
प्रतिनिधी / मिरज
दरोड्याच्या गुन्ह्याखाली अटकेत असलेला आरोपी कोरोनाबाधित आढळल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याने पोलिसांच्या आणि रुग्णालय प्रशासनाच्या हातावर तुरी ठेवत पळ काढल्याचा प्रकार घडला. केदारसिंह रमेश मेहडा (वय 25) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर आरोपीने बाथरूमच्या खिडकीतून पळ काढला असल्याचे सांगण्यात आले.
याबाबत कुपवाड एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, केदारसिंह रमेह मेहडा हा अट्टल चोरटा असून, दरोड्याच्या गुन्ह्याखाली कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र, सदर आरोपीची कोरोना चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह निघाला. त्यामुळे त्याला मिरज शासकीय रुग्णालयात कोविड सेंटरमध्ये दाखल केले होते. त्याच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते.
सोमवारी 4 जानेवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता बाथरूमला जावून येतो असे सांगून तो गेला. मात्र, बराच उशीर झाला तरी तो बाथरूममधून बेहर आला नाही. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी बाथरूमच्या दरवाजा उघडून पाहिले असता, बाथरूमची खिडकी उघडलेली दिसली. त्यामुळे सदर आरोप बाथरूममधून पळून गेला असल्याचे कुपवाड एमआयडीसी पोलिसांना कळविण्यात आले. सदर कोरोना बाधित आरोपीने पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाच्या हातावर तुरी ठेऊन धूम ठोकल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.