प्रतिनिधी / बेळगाव
वकिलांना कोरोना झाल्यानंतर त्यांना कर्नाटक राज्य बार असोसिएशनच्यावतीने मदत केली जात आहे. घरामध्ये उपचार घेणाऱया वकिलांना दहा हजार रुपये तर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या वकिलांना 25 हजार रुपये अशी मदत करण्यात येत आहे. आतापर्यंत 1 कोटी 68 लाख 75 हजार रुपये राज्यातील कोरोनाग्रस्त वकिलांना वितरित करण्यात आल्याची माहिती कर्नाटक राज्य बार कौन्सिलच्यावतीने देण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये घरामध्ये उपचार घेतलेल्या 289 वकिलांचे तर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या 101 वकिलांचे अर्ज निकालात काढण्यात आले. दुसऱया टप्प्यामध्ये घरामध्ये उपचार घेतलेल्या 244 वकिलांना तसेच हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या 119 वकिलांना मदत करण्यात आली. तिसऱया टप्प्यामध्ये घरामध्ये उपचार घेतलेल्या 242 आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या 153 जणांना आर्थिक मदत आतापर्यंत केली आहे.
कोरोनाबाधित वकिलांनी कर्नाटक राज्य बार असोसिएशनकडे अर्ज केल्यानंतर बैठकीत विचार विनिमय करून अर्ज निकालात काढण्यात येत आहेत. यापुढेही ही मदत सुरू राहणार आहे. तरी कोरोना झालेल्या वकिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर्नाटक राज्य बार कौन्सिलचे सदस्य विनय मांगलेकर यांनी केले आहे.