बेंगळूरमध्ये 7 संशयित रूग्णांना कोरोनाची लागण नाही : वैद्यकीय अहवालातून स्पष्ट
प्रतिनिधी/ बेंगळूर
चीनमध्ये थैमान घालून अनेकांचे बळी घेतलेल्या कोरोना विषाणूबाबत राज्यात सतर्कता बाळगण्यात येत आहे. विदेशातून विमानतळांवर दाखल होणाऱयांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. बेंगळूरमध्ये आढळून आलेल्या 7 संशयित रूग्णांची विविध तपासण्या करण्यात आल्या असून त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
केरळमध्ये कोरोनाचा रूग्ण आढळून आल्यानंतर राज्यात संशयित रूग्णांवर डॉक्टरांचे विशेष पथक लक्ष ठेवून आहेत. आरोग्य खात्याने बेंगळूर शहरात सतर्कतेची सूचना दिली आहे. बेंगळूरमध्ये तपासणीवेळी 7 संशयित रूग्ण आढळून आले होते. त्यामध्ये एका चीनी युवतीचाही समावेश होता. त्यांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल शुक्रवारी आला असून त्यांना कोरोनाची लागण झालेली नाही, असे आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे.
बेंगळूरमधील राजीव गांधी इस्पितळ आणि बेंगळूर वैद्यकीय महाविद्यालयात एनआयव्ही प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. या ठिकाणी कोरोनाच्या संशयित रूग्णांचे रक्त आणि कफाचे नमुने तपासण्यात येत आहेत. 24 तासांत या प्रयोगशाळेतून संशयित रूग्णासंबंधीचा अहवाल दिला जाणार आहे. सोमवारपासून हे दोन्ही प्रयोगशाळा कार्यान्वित होतील. याआधी पुणे येथील प्रयोगशाळेकडे नमुने पाठविण्यात येत होते. तेथून अहवाल येण्यास 72 तासांचा अवधी लागत होता. आता बेंगळूरमध्येच ही व्यवस्था करण्यात आली आहे.
25 इस्पितळांमध्ये स्वतंत्र वॉर्ड
कोरोना विषाणूबाबत जागृती म्हणून राज्यातील 25 इस्पितळांमध्ये आयसोलेशन वॉर्ड (स्वतंत्र व्यवस्था) सूरू करण्यात आले आहेत. केंद सरकारने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांशी चर्चा करून कोरोनाबाबत खबरदारी उपाययोजना हाती घेण्याज्या सूचना दिल्या आहेत. याप्रसंगी राज्य सरकारने हाती घेतलेल्या उपाययोजनांची माहिती केंद्राला दिली आहे. बेंगळूरच्या राजीव गांधी इस्पितळात 15 बेड असणारे स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्यात आले आहे. सर्व जिल्हा इस्पितळांमध्येही अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
21 जण डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली
गुरुवार दि. 30 जानेवारापासून राज्यात 21 प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये कोरोनाचे 10 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. 11 प्रवाशांना त्यांच्या घरातच उपचार केले जात आहेत. या सर्वांच्या 13 प्रकारच्या विविध तपासण्या आणि चाचण्या केल्या जात आहेत. राजीव गांधी इस्पितळात सध्या कोरोनाच्या तीन संशयित रूग्णांवर उपचार केले जात आहे.