प्रवीण देसाई/कोल्हापूर
कोरोनाचा फटका सर्वच घटकांना बसला. या संकटकाळात अनेकांचे रोजगार गेले. परंतु अशा कठीण काळातही शासनाचा रोजगार हमी विभाग पुढे सरसावला. एप्रिल 2021 ते ऑगस्ट 2021 या पाच महिन्याच्या काळात जिह्यातील 20 हजार 588 मजूरांना रोजगार उपलब्ध करुन दिला. या कामाच्या मजुरीपोटी 5 कोटी 10 लाख 51 हजार रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली.
रोजगार हमी योजना विभागाने कोरोनाच्या संकटकाळात गेल्या पाच महिन्यात वैयक्तिक व सार्वजनिक कामे उपलब्ध करुन दिली. `रोहयो’ च्या पात्र यादीतील 11 हजार 740 कुटूंबांमधील 20 हजार 588 लाभार्थ्यांना रोजगार मिळाला. त्यांना दिवसाला 248 रुपये या प्रमाणे मजूरी मिळाली. यासाठी 5 कोटी 10 लाख 51 हजार रुपये निधी वितरित करण्यात आला. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून संबंधित लाभार्थी मजूराच्या बँक खात्यावर थेट रक्कम जमा करण्यात आली. दर पंधरा दिवसातून लाभार्थ्याच्या खात्यावर मजूरीची रक्कमक जमा करण्याची प्रक्रीया आहे.
कोणीही बेरोजगार राहू नये, त्याच्या हाताला काम मिळावे, यासाठी रोजगार हमी विभागाकडून कामे उपलब्ध करुन दिली जातात. राज्यातील इतर जिह्यांच्या तुलनेत रोजगार हमी योजनेच्या कामांची गरज कोल्हापूर जिह्यात थोडी कमी आहे. असे असले तरीही संकटाच्या काळात `रोहयो’च्या कामांनी मजूरांना आधार मिळाला आहे. कृषी विभाग, जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग, वन विभाग आदी विभागांच्या माध्यमातून ही कामे झाली आहेत. कोरोनाच्या संकटकाळात जवळपास सर्वच ठप्प असताना `रोहयो’ने लाभार्थ्यांना रोजगार मिळवून देण्याचे काम केले आहे. नक्कीच हे दिलासादायक आहे
`रोहयो’तील कामे अशी…
वैयक्तिक कामे : घरकुल, सिंचन विहीर, शौचालय बांधकाम, शौचखड्डा (सर्व कामे ग्रा.प.विभाग), फळबाग लागवड, नापेड (सर्व कामे कृषी विभाग), किटक संगोपन व तुती लागवड (रेशीम विभाग).
सार्वजनिक कामे : शाळा संरक्षित भिंत बांधणे, शाळा शौचालय बांधणे, पाणंद रस्ते (सर्व ग्रा.प. विभाग), वृक्षलागवड, रोपवाटीका (वन विभाग व सामाजिक वनीकरण विभाग).
रोजगार मिळालेले लाभार्थी असे
तालुका लाभार्थी संख्या
आजरा 1633
गगनबावडा 640
भुदरगड 2045
चंदगड 2191
गडहिंग्लज 2405
हातकणंगले 2055
कागल 2311
करवीर 1255
पन्हाळा 1224
राधानगरी 2692
शाहुवाडी 902
शिरोळ 1235
कोरोनाच्या कठीण काळात हाताला काम मिळण्याची गरज होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या रोजगार हमी योजना विभागाने जास्तीत लाभार्थी मजूरांना ही कामे देण्याचा प्रयत्न केला. इथून पुढेही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली `रोहयो’ च्या कामाची उद्दीष्ट पुर्ती करण्यासाठी प्रयत्न राहील. -प्रज्ञा कांबळे, नायब तहसिलदार (रोहयो)