वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2018 च्या अशायाई क्रीडास्पर्धेत कास्यपदक मिळविणारा भारताचा ज्येष्ठ टेबल टेनिसपटू अँथोनी अमलराज आता कोरोना व्याधीतून पूर्णपणे बरा झाला असला तरी सोनेपत येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय टेबल टेनिस सराव प्रशिक्षण शिबिरात सुरक्षतेसाठी सहभागी होणार नाही.
अँथोनी अमलराजने यापूर्वी दोनवेळा टेबल टेनिस प्रकारात राष्ट्रीय विजेतेपद मिळविले आहे. गेल्या महिन्यात अमलराजला कोरोनाची बाधा झाल्याने त्याला चेन्नईच्या एका रूग्णालयात वैद्यकीय इलाजासाठी दाखल करण्यात आले होते. अमलराजच्या आई-वडिलांनाही कोरोनाची बाधा झाली होती. या रूग्णालयात डॉक्टरी इलाजानंतर अमलराज कोरोना व्याधीतून आता पूर्णपणे बरा झाला आहे. 25 ऑक्टोबर रोजी अमलराजला रूग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली होती. कोरोनाच्या भीतीमुळे अमलराजने सोनेपत येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय टेबल टेनिस प्रशिक्षण सराव शिबिरात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या संकटातून आपली मुक्तता केल्याबद्दल 34 वर्षीय अमलराजने परमेश्वराचे आभार मानले आहेत. अमलराजने आता किमान आणखी एक महिना घरीच राहण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांनी त्याला आणखी 15 दिवस पूर्ण विश्ा़खांतीचा सल्ला दिला आहे.
सोनेपत येथे राष्ट्रीय टेबल टेनिस सराव शिबीर 42 दिवस चालणार आहे. या शिबिरात शरथ कमल व अन्य टेबल टेनिसपटू सहभागी झाले आहेत. जी साथीयान आणि हरमित देसाई हे सध्या युरोपमधील विविध क्लबकडून खेळत असल्याने ते या शिबिरात अद्याप दाखल झालेले नाहीत. अखिल भारतीय टेबल टेनिस फेडरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष एस.एम. सुल्तान यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने या संघटनेला मोठा धक्का बसला आहे. कोरोनामुळे सुल्तान यांची पत्नी आणि आई यांनाही आपला जीव गमवावा लागला आहे.