तरुण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. शनिवारी उपचाराअंती आ. पडळकर कोरोनामुक्त झाल्याने पंढरपुरातील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. प्रसंगी कार्यकर्त्यांनी जेसीबीने फुले उधळून आ. पडळकरांचे स्वागत केले.
भाजपा नेते आमदार गोपीचंद पडळकर यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांना पंढरपुरातील गणपती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अखेर शुक्रवारी त्यांची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर शनिवारी दुपारी एक वाजता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
याप्रसंगी रुग्णालयाच्या बाहेर पडळकर यांचे समर्थक आणि इतर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी धनगर समाजाच्या वतीने पडळकरांवर चक्क जेसीबीच्या सहाय्याने फुले उधळण्यात आली. आणि त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ‘एकच छंद गोपीचंद’ अशा घोषणांनी संपूर्ण रुग्णालयाचा परिसर दणाणून गेला.
यावेळी पंढरपुरातील शेतकरी चळवळीतील नेते माऊली हळणवर यांच्यासह आटपाडी येथून देखील असंख्य पडळकर समर्थक स्वागतासाठी हजर होते.