ऑनलाईन टीम / नागपूर :
लॉकडाऊन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याला 14 दिवस सक्तीचे क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कोरोनामुक्त झालेली व्यक्ती व्यवसायाने टेलर आहे. नागपूरच्या मोमीनपुरा परिसरात ही व्यक्ती वास्तव्यास असून, मागील महिन्यात या व्यक्तीने दिल्ली प्रवास केला होता. त्यानंतर कोरोनाची लक्षणे आढळल्याने या व्यक्तीला नागपुरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. 4 एप्रिलला या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर 14 दिवस उपचार करून पुन्हा टेस्ट केली असता ती निगेटिव्ह आल्याने या व्यक्तीला शुक्रवारी रात्री डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, या व्यक्तीने घरी गेल्यानंतर लॉकडाऊन आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.