प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
वायगंणी (वेंगुर्ले) आणि जांभवडे (कुडाळ) येथील दोन रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षातून त्यांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी उपस्थित आरोग्य विभागातील डॉक्टर्स, नर्स व
प्रशासकीय अधिकारी-कर्मचाऱयांनी टाळय़ा वाजवत त्यांना शुभेच्छा दिल्या.
वायगंणी येथील एक व जांभवडे येथील एक अशा दोन व्यक्तींना ‘कोरोना’ची लागण झाली होती. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात औषधोपचार सुरू होते. या कक्षातील डॉक्टर्स, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ यांनी योग्यप्रकारे उपचार केले. कोविड कक्षात दाखल केल्यापासून 14 दिवसानंतर सदर व्यक्तींची स्वॅब टेस्ट घेण्यात आली. त्या दोघांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.
यावेळी समूपदेशक रणजीत जाधव यांनी संबंधित रुग्णांना घरी परतल्यानंतर कोणत्या प्रकारे स्वत:ची काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. प्रारंभी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी संबंधित रुग्णांचे अभिनंदन करत कोरोनामुक्त झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच यापुढे स्वत:ची योग्यप्रकारे काळजी घेऊन समाजात वावर कसा असावा, याबाबत मौलिक सल्ला दिला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील, प्रशासकीय अधिकारी डॉ. अविनाश नलावडे, फिजिशियन डॉ. नागेश पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एम. मोरे, मेट्रन आर. जी. नदाफ तसेच डॉक्टर्स, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ उपस्थित होते.