ऑनलाईन टीम / वेलिंग्टन :
कोरोनामुक्त झालेल्या न्यूझीलंडमध्ये 24 दिवसानंतर नव्याने दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या दोघांनीही इंग्लंडमधून प्रवास केल्याची नोंद आहे. न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
दोन आठवडे कोरोनाचा एकही रुग्ण न आढळल्याने न्यूझीलंडने 8 जून रोजी देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली होती. कोरोनामुक्त ठरलेले हे जगातील पहिले राष्ट्र होते. देशात एकही कोरोना रुग्ण नसल्याने न्यूझीलंडने कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लागू केलेले देशांतर्गत सर्व निर्बंध हटवले आहेत.
न्यूझीलंडमध्ये यापुढे सोशल डिस्टंसिंग पाळण्याची गरज नाही. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांनाही पूर्ण मोकळीक देण्यात आली आहे. परदेशी नागरिकांसाठी देशाच्या सीमा मात्र अजूनही बंद असतील, असे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी जाहीर केले होते. मात्र, नव्याने दोन पॉझिटिव्ह केस समोर आल्याने न्यूझीलंडची चिंता पुन्हा वाढली आहे.