डॉ. व्ही. व्ही. शिंदे यांचे नागरिकांना आवाहन : चिकोडी शहरातील विविध मार्गावरून कोरोना जागृती रॅली
प्रतिनिधी / चिकोडी
कोरोनाच्या महामारीने देशांमध्ये व जगामध्ये घबराट पसरली आहे. अशा सांसर्गिक कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी नागरिकांनी स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतः खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी कोरोनाची भीती न बाळगता त्यापासून बचावाचे उपाय योजने आवश्यक असल्याचे मत तालुका वैद्याधिकारी डॉ. व्ही. व्ही. शिंदे यांनी व्यक्त केले.
येथील मिनी विधानसौधच्या आवारात केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान खाते, राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान संवहन परिषद, विकसन केंद्र बेळगाव, तालुका प्रशासन चिकोडी यांच्या संयुक्त आश्रयाखाली कोरोना जागृती अभियानाचे उद्घाटन करून ते बोलत होते.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक अशोक कुळ्ळूर, पोलीस ठाण्याचे साहाय्यक उपनिरीक्षक महावीर लाटकर, महसूल खात्याचे शिरस्तेदार पी. बी. शिरीवंत, तहसीलदार के. एम. कटम, साहाय्यक सीडीपीओ सुप्रिया जडगे, महसूल निरीक्षक के. बी. कोलकर, अनुसया बाळाप्पगोळ उपस्थित होते. मिनी विधानसौध येथून सुरू झालेली जागृती रॅली शहरातील विविध मार्गावरून काढण्यात आली. यावेळी जागृती गीते सादर करण्यासोबत कर पत्राचे वितरण करण्यात आले.
चिकोडी येथील आशादीप कलापथकाच्या कलाकारांनी पथनाटय़ व जागृती गीते सादर केली. भरत कलाचंद्र यांनी सूत्रसंचालन तर संजू मगदूम यांनी आभार मानले. नगरसभेच्या आवारातील कोरोना रॅलीचे उद्घाटन नगराध्यक्ष प्रवीण कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रवीण कांबळे, उपनगराध्यक्ष संजय कवटगीमठ यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी तालुका वैद्याधिकारी डॉ. व्ही. व्ही. शिंदे, आरोग्य निरीक्षक तुकाराम जमखंडी, विजय वाघमारे उपस्थित होते. चिकोडीसह रामनगर, करोशी येथेही कोरोना जागृती करण्यात आली. यामध्ये भरत कलाचंद्र, मारुती कामगौडा, आप्पासाहेब चिमणे, मारुती कमते, संतराम मयूर, पुंडलिक नाईक यांनी सहभाग घेतला होता.