वार्ताहर / यमगे
कोविड 19 पासून बचावलेल्या व्यक्तीचे रक्त कोरोना रुग्णासाठी रामबाण व्हॅक्सीन असल्याचा दावा करून कोट्यावधी रुपयांचे रक्त विक्री करण्याचा गोरख धंदा सायबर माफियांकडून जोरात सुरू आहे. डार्कनेटवर लोकप्रिय मार्केट साईट्सवर जाहिरात करून कोट्यवधींचा कारभार सुरू आहे. हे रक्त संबंधित रक्तगट असणाऱ्या कोविड रुग्णास दिल्यास आयुष्यभर कोरोना पासून संरक्षण कवच बहाल करेल असा दावा डार्क नेटवर विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था वाईस एयु यांच्या हवालानुसार हे वृत्त समाज माध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे.
ऑस्ट्रेलिया नॅशनल युनिव्हर्सिटीच्या गुन्हेगारशास्त्र विभागाच्या संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात या सायबर गुन्हेगारी वर प्रकाश टाकण्यात आला आहे. सायबर क्रिमीनल्स कोविड 19 ग्रस्त रुग्ण आणि नातेवाईकांना हेरून असे दावे करत आहेत.कोरोना उपचारासाठी 100 हुन अधिक उत्पादने असे दावे करून विकली जात आहेत. या उत्पादनांमध्ये क्लोरोक्वीन सारखी, कोविडवरील औषधे, रोग निदान चाचण्या, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्वीपमेंट्स, कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांचा प्लाझमा यांचा समावेश आहे. समाज माध्यमातील या बातम्यांमुळे खळबळ उडाली आहे. वृत्त संस्थेच्या अहवालानुसार डार्क नेटवर अशी उत्पादने विकली जात आहेत. प्रसिद्ध असणाऱ्या ऑनलाइन मार्केट साइटवर कोरोना मुक्त रुग्णाच्या एक लिटर रक्तासाठी 21 हजार सहाशे डॉलर किंमत आकारली जात आहे. ही औषधे व उत्पादने काही डॉक्टर्स उपलब्ध करून देत आहेत असा दावा करण्यात आला आहे. औषधे व रक्त खरेदीसाठी ऑनलाईन मागणी केल्यास स्वीडन मधील एका वितरकाकडून कुरिअर पोस्टद्वारे हे उपलब्ध होत असल्याचे या बातमीत म्हटले आहे.
ऑस्ट्रेलिया नॅशनल युनिव्हर्सिटी मधील प्रमुख संशोधक रॉड ब्रॉडहर्स्ट यांच्यामध्ये हे रक्त संबंधित रक्तगटाच्या रुग्णांना दिले जाते.कोरोना आजारातून मुक्त झालेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये तयार झालेली कोरोनास प्रतिबंध करणारी अँटीबॉडीजचा फायदा कोरोनाग्रस्त व्यक्तीस आजारातून लवकर बरे होण्यास होईल या आशेने असे रक्त आणि इतर साधने खरेदी केली जात आहेत. ब्रॉड फर्स्ट यांच्यामते हे एक प्रकारचे पॅसिव्ह व्हॅक्सिनेशन आहे.प्लाझमा थेरपी मध्ये कोरोनामुक्त व्यक्तीच्या रक्तातील प्लाझमा घटक शास्त्रीय पद्धतीने जोपासून तो पुन्हा कोरोनाग्रस्त रुग्णाला दिला जातो.पण पॅसिव्ह व्हॅक्सीनेशन मध्ये सरळ रक्त चढवले जाते. 3 एप्रिल 1920 या दिवशी ऑस्ट्रेलिया नॅशनल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी डार्क नेटवरील विविध मार्केट साइट्स सर्वे केला या एका दिवशी 61 टक्के उत्पादने अमेरिकेमध्ये मागवली गेली.युरोप खंडातील देशांमध्ये 6 टक्के,ब्रिटनमध्ये 2.6 व ऑस्ट्रेलियामध्ये 0.5 टक्के रक्त आणि औषधे मागवण्यात आली. बनावट, फसव्या आणि चाचणी न झालेल्या व्हॅक्सीन्स,टेस्टिंग किट्स,रक्त,औषधें वापरणे घातक ठरू शकते असाही इशारा संशोधकांकडून देण्यात आला आहे.