नेसरी / प्रतिनिधी
देशात कोरोना विषाणू आजारामुळे सर्वांना लॉकडाउनला सामोरे जावे लागत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने, व्यवसाय बंद आहेत. अशातच लॉकडाउन मध्ये गुढीपाडवा आणि साडेतीन मुहूर्तातील अक्षय तृतीया हे दोन मोठे मुहूर्त हुकल्यामुळे नेसरीतील व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. तर याच मुहूर्तांची संधी साधत खरेदी करणाऱ्या ग्राहकांची मात्र निराशा झाली आहे.
मुहूर्तावर खरेदी करण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. मुहूर्ताविना खरेदी हुकल्याने ग्राहकांतून नाराजी आहे. देशात महाभयंकर कोरोना विषाणू आजाराचे संकट आल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू लागू केला होता मात्र त्याच सायंकाळी देश १४ एप्रिल पर्यंत आणि त्यानंतर खबरदारी म्हणून दुसऱ्या टप्यातील लॉकडाउन ३ मे पर्यंत जाहीर केल्याने गुढीपाडव्यानंतर किमान साडेतीन मुहूर्तातील अक्षय तृतीयाला बाजारपेठ खुली होईल हा अंदाज फोल ठरला.
मुहूर्तावर एखादी वस्तू घरी आणायची असा योग साधण्याचा सगळेच प्रयत्न करतात. मात्र लॉकडाउनच्या काळात गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया हे मुहूर्त आल्याने मोठा पेच व्यावसायिकांसह ग्राहकांवर आला. कित्येक वर्षांपासून आपण बघत आलो आहोत की मुहूर्त आले की सराफ, इलेक्ट्रॉनिक, वाहन, फर्निचर, वस्त्र दुकाने ग्राहकांना जास्तीत जास्त खरेदीसाठीचे आवाहन करत सवलतींचा वर्षाव करतात. या मुहूर्तांवर दुकानाच्या सजावटीसह दारात मंडप उभारून ग्राहकांना आकर्षित केले जाते. तर याच दुकानातून ग्राहकांची तोबा गर्दीही पहायला मिळते. मात्र कोरोनाच्या या संकटामुळे हे सगळे चित्र यंदाच्या गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया मुहूर्ताला बगायला मिळाले नाही. सोने, चांदी, मोबाईल, टीव्ही, फ्रिज, वाशिंग मशीन, फर्निचर, गृहपयोगी वस्तू, दुचाकी, चारचाकी, ब्रँडेड कपडे यांच्या खरेदीने नेसरीची बाजारपेठ या दोन्ही मुहूर्तांवर गजबजून जाऊन लाखोंची उलाढाल व्हायची. सध्या ही सर्वच दुकाने बंद असल्यामुळे हौशी ग्राहकांना मात्र खरेदीला मुकावे लागले.
तर याच अक्षय तृतीया महूर्तावर ग्राहकांना खरेदी जरी करता आली नसली तरी या अक्षय तृतीयाचा मुहूर्त साधत किमान आपल्या आवडत्या वस्तू बुकिंग करून ठेवण्यासाठीचा पर्याय उपलब्ध करून देत तशा जाहिराती व सोशल मीडियावरून आपल्या ग्राहकांसाठी प्रसिद्ध करत बुकिंग सेवा चालू केली आहे. त्यामुळे मुहूर्त साधत खरेदी नसेना पण किमान आपली आवडती वस्तू बुकिंग केल्याचे समाधान ग्राहकांना करावे लागले. एकूणच कोरोनाच्या या संकटामुळे व्यवसायिकांसह ग्राहकांचे हे दोन मुहूर्त हुकल्याने नाराजी व्यक्त होत आहे.