प्रतिनिधी / सांगली
कोरोनाने जिल्ह्यात सात बालकांच्या आई व वडील यांचा मृत्यू झालेला आहे. 27 बालकांच्या आईंचा मृत्यू झाला आहे. तर 274 बालकांचे वडील कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. आत्तापर्यंत सर्वेक्षणात 370 बालके आढळून आली असून 308 बालकांचे सामाजिक तपासणी अहवाल एनसीपीसीआरवर नोंद केले आहेत. उर्वरित बालकांचे सामाजिक तपासणी अहवाल तातडीने पूर्ण करून कोरोनाने ज्या बालकांचे आई, वडील यांचा मृत्यू झालेला आहे, अशा बालकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात बालसंरक्षण हक्क समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार, महानगरपालिका उपआयुक्त राहूल रोकडे, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश विश्वास माने, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल विकास शिल्पा पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बाबासाहेब नागरगोजे, तहसिलदार शरद घाडगे, बाल कल्याण समिती अध्यक्षा अॅड. सुचेता मलवाडे व समिती सदस्य उपस्थित होते.