जि. प. महिला बालकल्याण सभा : शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणार!
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोनामुळे दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेली बालके आणि कर्ता पुरुष गेल्याने विधवा झालेल्या महिलांसाठी ‘मिशन वात्सल्य’ योजना राबविण्यात येणार असून या योजनेतंर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार आहे, अशी माहिती जि. प. महिला व बालविकास समिती सभेमध्ये सभापती शर्वणी गावकर यांनी दिली. तसेच अंगणवाडी सेविकांनी लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना लाभ मिळवून देण्याच्या सूचनाही केल्या.
जि. प. च्या बॅ. नाथ पै सभागृहात सभापती शर्वाणी गावकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी समिती सदस्या माधुरी बांदेकर, श्वेता कोरगावकर, पल्लवी झिमाळ, संपदा देसाई, वर्षा कुडाळकर, समिती सचिव अमोल पाटील, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विनित म्हात्रे उपस्थित होते.
‘शासन आपल्या दारी’ या धर्तीवर शासनाने कोरोनाने दोन्ही पालक गमावल्याने अनाथ बालकांसाठी तर कर्ता पुरुष गेल्याने विधवा झालेल्या महिलांसाठी ‘मिशन वात्सल्य’ योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये अनाथ बालकांना पाच लाख रुपये दिले जाणार असून त्यांना अनाथ असल्याचे प्रमाणपत्रसुद्धा दिले जाणार आहे. त्यामुळे त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. तसेच नोकरभरतीत अनाथ बालकांना एक टक्का जागा राखून ठेवल्या जाणार आहेत. तसेच कोरोनाने कर्ता पुरुष गेल्याने विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. ‘मिशन वात्सल्य’ योजना राबविण्यासाठी तालुका तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक तालुक्मयात समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीमार्फत अनाथ बालके व विधवा महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार आहे, अशी माहिती सभापती शर्वाणी गावकर व अधिकारी विनित म्हात्रे यांनी दिली.
‘मिशन वात्सल्य’ योजना राबविण्यासाठी समिती नेमली तरी अंगणवाडी सेविकांनी लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करावी व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या.
मत्स्यविक्रेत्या महिलांना शीतपेटय़ा
किनारपट्टी भागातील मत्स्यविक्री करणाऱया महिलांना महिला व बालविकास विभागामार्फत शीतपेटी देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे एक हजार महिलांना याचा लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती सभापतींनी दिली. तसेच शिलाई मशीन व घरघंटीसाठी वाढीव निधी उपलब्ध झाल्याने प्रस्ताव मागविण्याचे आदेश देण्यात आले. तर कुपोषित मुलाची दखल घेऊन ती कुपोषणमुक्त करण्यासाठी
प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात आले. !