वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू वर्षी होणाऱया अमेरिकन खुल्या तसेच कॅनडा खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा कोरोना समस्येमुळे रद्द करण्याचा निर्णय शुक्रवारी विश्व बॅडमिंटन फेडरेशनने घेतला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा नव्याने कोरोनाचा प्रसार होत असल्याचे आढळून आले असून कोरोनाच्या कडक नियमावलीमुळे या स्पर्धा रद्द कराव्या लागत असल्याचे फेडरेशनच्या प्रवक्त्याने सांगितले. 6 ते 11 जुलै दरम्यान एचएसबीसी विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या टूरवरील अमेरिकन खुली सुपर 300 दर्जाची स्पर्धा घेतली जाणार होती. तसेच 29 जून ते 4 जुलै दरम्यान सुपर 100 कॅनडा खुली बॅडमिंटन स्पर्धा आयोजित केली होती. पण या स्पर्धेच्या स्थानिक आयोजकांनी कोरोना संदर्भातील कडक नियमावलीमुळे सदर स्पर्धा भरविणे अशक्य असल्याचे विश्व बॅडमिंटन फेडरेशनला कळविले आहे. या दोन्ही स्पर्धा रद्द झाल्याने आता आशियाई बॅडमिंटन फेडरेशनची आशियाई चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली आहे. सदर स्पर्धा ऑलिम्पिक पात्रतेसाठी आहे. 2020 ची टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धा कोरोना समस्येमुळेच एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली होती. आता ही स्पर्धा येत्या जुलै दरम्यान घेतली जाणार आहे. ऑलिम्पिक पात्रता पद्धतीच्या फेरबदल नियमानुसार आता रद्द करण्यात आलेल्या स्पर्धेऐवजी कोणतीही बदली स्पर्धा घेतली जाणार नसल्याचे फेडरेशनच्या प्रवक्त्याने सांगितले.