मडगावातील हॉटेल मालक दगावला : भिकाऱयालाही बाधा : दगावलेल्यांची संख्या पोहचली 30 वर : मुरगाव तालुक्यात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू : 149 नव्याने रुग्ण, 92 कोरोनामुक्त
प्रतिनिधी / मडगाव, पणजी
मडगावच्या न्यू मार्केट मधील वसंत भुवन या हॉटेलचे मालक प्रशांत शेट्टी (50) यांचा काल बुधवारी सकाळी 6.30 वाजता कोविड हॉस्पिटलमध्ये बळी गेला. तर मडगावच्या हिंदू फार्मसीजवळ सोमवार दि. 29 जुलै रोजी एका भिकाऱयाला मृत्यू आला होता. त्याची स्वॅब चाचणी घेण्यात आली असता त्याचाही कोविडमुळे बळी गेल्याचे कालच स्पष्ट झाले आहे. बोगदा-वास्को येथील एका 52 वर्षीय व्यक्तीचे गोमेकॉत निधन झाले. तर बुधवारी रात्री 8.45 वाजता मांगोरहिल-वास्को येथील एका 71 वर्षीय व्यक्तीचे निधन झाले. त्याच्यावर कोविड हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यामुळे कोविडमुळे बळी गेलेल्याची संख्या 30 वर पोचली आहे.
प्रशांत शेट्टी यांना कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी आठ दिवस ताप येत होता व ते तापावर गोळय़ा घेत होते. नंतर त्यांनी आपल्या कुटुंबासह कोरोनाची चाचणी घेतली असता ते सर्वजण पॉझिटिव्ह आढळून आले होते. प्रशांत व त्यांची पत्नी लक्षणेयुक्त आढळल्याने त्यांना कोविड हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते तर त्याच्या मुलींना फर्मागुडी येथील कोविड निगा केंद्रात ठेवण्यात आलेले आहे. प्रशांत यांनी कोरोनाची चाचणी घेतल्यानंतर पाच दिवसांनी त्यांचा अहवाल आला. तोपर्यंत ते घरातच राहिले.
प्रशांत यांची मडगावच्या न्यू मार्केट परिसरात बरीच मित्रमंडळी असून त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आता कोविड चाचणी करून घेणे आवश्यक बनले आहेत. त्याच्या हॉटेल शेजारील अन्य एका दुकानदाराने चाचणी करून घेतली असता त्याला ही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.
प्रशांत यांचा निष्काळजीपणा का ?
मडगावच्या न्यू मार्केटमध्ये हॉटेल असलेल्या वसंत भुवनचे मालक असलेल्या प्रशांत शेट्टी यांनी आठ दिवस ताप येत असतानासुद्धा त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. केवळ तापाच्या गोळय़ा घेऊन ते राहिले. त्यानंतर पुन्हा कोरोना चाचणीचा अहवाल येण्यासाठी पाच दिवसांचा विलंब झाला. यामुळे त्यांनी आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले का ? असा सवाल आत्ता उपस्थितीत होत आहे. प्रशांत हे फातोर्डा येथे राहत होते. त्यांच्या निधनामुळे फातोडर्य़ात कोविडमुळे मृत्यू आलेल्यांची संख्या दोनवर पोहचली आहे.
ताप, सर्दी असेल तर त्वरित आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात लोकांनी संपर्क साधावा असे सरकारतर्फे वारंवार आवाहन करून देखील लोक त्याकडे दुर्लक्ष करतात हे आत्ता स्पष्ट झाले आहे. खोर्ली-म्हापसा व वास्कोत तिघांनी अशाच प्रकारे ताप येत असतानासुद्धा दुर्लक्ष केले. परिणामी त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
मडगावात कोविडमुळे दुसऱया भिकाऱयाचा मृत्यू
मडगावच्या हिंदू फार्मसी जवळ सोमवारी एक भिकारी मृत अवस्थेत सापडला होता. त्याची स्वॅब चाचणी घेतली होती. त्याचा अहवाल काल बुधवारी मिळाला व तो कोविड पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कोविडमुळे मृत्यू आलेल्या भिकाऱयांची संख्या दोनवर पोचली आहे. यापूर्वी मडगावच्या रॉयल चिकन या आस्थापनाजवळ एका पॅसेजमध्ये भिकारी मृत अवस्थेत सापडला होता. नंतर त्याची चाचणी घेण्यात आली असता तो पॉझिटिव्ह आढळून आला होता.
गोमेकॉत वास्कोतील व्यक्तीचा बळी
बोगदा-वास्को येथील एका 52 वर्षीय व्यक्तीचा गोमेकॉत बळी गेला. ही व्यक्ती एका कंपनीत वाहन चालक म्हणून काम करीत होती. तिला ताप येत असल्याने चिखली येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले हाते. मात्र, प्रकृती खालावल्याने गोमेकॉत पाठविले होते. त्या ठिकाणी मंगळवारी रात्री मृत्यू आला. स्वॅब चाचणी घेतली असता ही व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. गोमेकॉत कोविडचा बळी जाण्याची ही पहिलीच घटना आहे. मुरगाव तालुक्यात कोविडमुळे आतापर्यंत 18 जणांचे बळी गेले आहेत. बुधवारी रात्री 8.45 वाजता मांगोरहिल-वास्को येथील एका 71 वर्षीय इसमाचा कोविड हॉस्पिटलात बळी गेला. या इसमाला मूत्रपिंडाचा आजार होता व बुधवारीच त्याच्यावर डायलेसिस करण्यात आले होते, अशी माहिती कोविड हॉस्पिटलातून देण्यात आली.
तिसऱया भिकाऱयाचा मृत्यू चाचणी अहवाल येणे बाकी
दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी सिने लताजवळ एका भिकाऱयाला मृत्यू आला. त्यालाही कोविडची लक्षणे होती. ताप येत असल्यामुळे तो गोळय़ा घेत होता अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याचीही स्वॅब चाचणी घेण्यात आली असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे.
गोवा बनलाय असुरक्षित
बुधवारी कोरोनाचे आणखी दोन बळी गेल्यामुळे एकूण बळींची संख्या 30 वर पोहोचली असून 149 जण कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले आहेत तर 92 जण बरे झाले आहेत. राजधानी पणजीसह इतरत्र अनेक नवीन कोरोनाबाधित मिळाल्याने जनतेमध्ये चिंता वाढत आहे. गोव्यात बहुतेक सर्व तालुक्यांत कोरोनाचा प्रसार झाला असून पॉझिटीव्ह रुग्ण आणि बळींची संख्या वाढतच चालली आहे. काही महिन्यांपूर्वी सुरक्षित असलेला गोवा आता पूर्णपणे असुरक्षित बनला आहे.
गोव्यात आतापर्यंत एकूण 4176 जणांना कोरोनाची लागण झाली असून 2541 जण त्यातून मुक्त झाले आहेत. सध्या 1607 सक्रिय कोरोना रुग्ण असून संशयित रुग्ण म्हणून 30 जणांना गोमेकॉतील आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करण्यात आले आहे. विविध रेसिडेन्सी हॉटेलमध्ये सुमारे 256 जणांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. विविध मार्गाने गोव्यात आलेल्या 129 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
बुधवारी 58 विदेशी तर 18 देशी प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले तर 178 जणांना फॅसिलिटी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. काल दिवसभरात 3013 जणांचे नमूने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील 1957 जणांचे अहवाल हाती आले असून त्यात 149 जण पॉझिटीव्ह सापडले, अशी माहिती आरोग्यखात्याने दिली आहे.
आरोग्यकेंद्राच्या यादीनुसार सांखळी 92, म्हापसा 61, चिंबल 72, मडगाव 67, वास्को 374, कुठ्ठळी 377, धारबांदोडा 46, फोंडा 57 अशी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शिवाय पणजी 38, पेडणे 26, कोलवाळ 37, पर्वरी 23, कुडचडे 15, नावेली 19 अशी नोंद तेथील आरोग्यकेंद्रात करण्यात आली आहे.