ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जगभरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक अन्न आणीबाणीचा इशारा दिला आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस कोरोनाच्या प्रकोपाबद्दल बोलताना म्हणाले की, जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अन्न आणि पोषणमूल्यांची कमतरता भासत आहे. जगातील 7.8 अब्ज लोकांकडे पुरेशा अन्नसाठा आहे. मात्र, सद्यस्थितीत 820 दशलक्षाहून अधिक लोकं उपाशी आहेत. त्यामध्ये 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या 144 दशलक्ष मुलांचा समावेश आहे.
मुबलक अन्न उपलब्ध असणाऱ्या देशातही आता अन्न पुरवठा साखळीत व्यत्यय येत असल्याची जोखीम दिसत आहे. खाद्यान्न प्रणाली अयशस्वी होत असून संपूर्ण जगभरात या गोष्टी बिघडत चालल्या आहेत. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुखांनी पोषणासाठी सामाजिक संरक्षण प्रणाली बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे. तसेच देशांना सुरक्षित, पौष्टिक खाद्यपदार्थ, विशेषत: लहान मुले, गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिला, वृद्ध लोक आणि इतर जोखीम असलेल्या गटांसाठी सुरक्षिततेची आवश्यकता आहे. त्यासाठी गुंतवणूक करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.