अशोक सराफ या ज्येष्ठ अभिनेत्यावर संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक-प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. कित्येक वर्ष प्रेक्षकांना विविध चित्रपट, मालिका आणि नाटक या तिन्ही माध्यमातून मनोरंजित करणारे अशोक मामा आता एका हॉरर कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सज्ज झाले. नुकताच त्यांचा आलटून पालटून हा चित्रपट झी टॉकिजवर प्रसारित झाला. अशोक सराफ यांच्या या चित्रपटातील भूमिकेबद्दल साधलेला हा खास संवाद.
या चित्रपटाची कथा फारच मजेदार आहे. आम्हा दोन भावांची कथा यात दाखवण्यात आलेली आहे. धाकटय़ा भावाचं लग्न जमवण्यासाठी खूप प्रयत्न करून देखील स्वत:च्या मालकीचं घर नसल्यामुळे त्याचं लग्न काही जमत नाही आणि असलेलं भाडय़ाचं घरही या दोघांना सोडावं लागतं. नंतर त्यांना खूप प्रयत्न करून एक पडका वाडा मिळतो आणि त्या वाडय़ामध्ये ते दोघे राहायला जातात. पण, त्या वाडय़ामध्ये राहायला गेल्यावर त्यांना जे काही अनुभव येतात आणि त्यातून जी काही धमाल होत जाते, वेगवेगळे प्रसंग घडत जातात त्याचं चित्रण म्हणजेच आलटून पालटून, असे त्यांनी सांगितले.
मी या चित्रपटात धनंजयची भूमिका साकारतोय. मी मोठा भाऊ आणि माझ्या धाकटय़ा भावाची भूमिका साकारली आहे तो म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका विनोदी अभिनेता भाऊ कदम. तो रिक्षा चालवत असतो आणि माझे कपडय़ाचे दुकान असते. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन संदीप नवरे यांनी केले आहे. संदीप हा अतिशय उत्तम दिग्दर्शक आहे. कॉमेडी काय आणि कशी असायला हवी याची उत्तम जाणीव त्याला आहे. माझ्या सोबत चित्रपटात असलेले बाकीचे कलाकार भाऊ कदम, सुनील तावडे, किशोरी आंबिये, संदीप पाठक, स्मिता शेवाळे, विनय येडेकर यांनी आपल्या भूमिका उत्तम साकारलेल्या आहेत. या सर्व कलाकारांना कॉमेडीची उत्तम जाण तर आहेच. पण सर्वांनी मराठी चित्रपटसफष्टीमध्ये स्वत:ची एक अनोखी ओळख निर्माण केलेली आहे, असे अशोक सराफ यांनी सांगितले.
आज देशामध्ये फार बिकट परिस्थिती आहे. कोरोनाने जगभर थैमान घातलं आहे. कोणीही घराबाहेर पडू शकत नाहीये. सर्वच फार कंटाळलेले आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपण सर्वजण कसोशीने प्रयत्न करत आहोत. म्हणूनच तुमच्या त्रासलेल्या, कंटाळलेल्या जीवावर फुंकर घालणारा हा चित्रपट आहे, असे अशोक सराफ यांनी स्पष्ट केले.