ऑनलाईन टीम / जीनिव्हा :
कोरोनामुळे जगभरातील पर्यटन व्यवसायाचे मागील पाच महिन्यात तब्बल 320 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. हे नुकसान 2009 साली आलेल्या जागतिक आर्थिक मंदीच्या काळातील नुकसानीच्या तुलनेत तिप्पट आहे. संयुक्त राष्ट्रांकडून यासंदर्भात एक अहवाल सादर करण्यात आला आहे.
कोरोना या जागतिक महामारीमुळे पर्यटन व्यवसायातील लाखो लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन धोक्यात आले आहे. काही देशात अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी पर्यटनाला काही अटी शर्थींसह परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढून पुन्हा देश लॉकडाऊन करावा लागू शकतो.
लॉकडाऊनमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे प्रमाण 300 दशलक्षाने घटले आहे. अमेरिका आणि चीन दोन देश आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी महत्वाचे मानले जातात. मात्र, याच देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी असला तरी अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक आहे.