मलकापूर नगरपरिषदेचा उपक्रम, मनोहर शिंदे यांची माहिती
प्रतिनिधी / कराड
कोरोनाच्या पहिल्या लाटेचा मोठा फटका मलकापूर शहराला बसला. दुसरी लाटही शहराचे बरेच नुकसान करून जात आहे. दरम्यान मलकापूर नगरपरिषदेच्या हद्दीतील ज्या पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशा पालकांच्या पाल्याचा शैक्षणिक खर्च मलकापूर नगरपरिषद करणार आहे. या योजनेला स्व. आनंदराव चव्हाण शिष्यवृत्ती योजना असे नाव देण्यात येणार असल्याचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी आज जाहिर केले.
मलकापूर येथे स्व.प्रेमिलाकाकी चव्हाण व स्व. आनंदराव चव्हाण यांच्या स्मृतीदिना निमित्त ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार मोहनराव कदम, उदयसिंह पाटील, नगराध्यक्षा नीलम येडगे, मुख्याधिकारी राहूल मर्ढेकर, राजेंद्र यादव, प्रशांत चांदे, सागर जाधव, कमल कुराडे, शकुंतला शिंगण यांच्यासह नगरसेवकांच्या उपस्थितीत शिंदे यांनी घोषणा केली.
उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे म्हणाले, मलकापूर नगरपरिषद परिसराला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. यामधे अनेक कुटूंबातील कर्ती माणस गमावली आहे. त्यांच्या पाल्यास शैक्षणिक अडचण येऊ नये म्हणून नगरपरिषद प्रयत्न करत आहे. त्यासाठी आनंदराव चव्हाण शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत मलकापूर कार्यक्षेत्रातील ज्या मुला -मुलींच्या पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशा मुला- मुलींचा प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा खर्च पालिकेच्या वतीने करणार असल्याचे सांगितले.