वृत्तसंस्था/ दुबई
ऑस्ट्रेलियात 2022 साली होणाऱया आयसीसी पुरुषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी युरोपमधील उपविभागीय तीन टी-20 पात्र फेरीच्या स्पर्धा कोरोना महामारी समस्येमुळे रद्द करण्यात आल्याची घोषणा शुक्रवारी आयसीसीच्या नियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आली.
रद्द करण्यात आलेल्या आयसीसीच्या या तीन पात्र फेरीच्या स्पर्धेपैकी पहिली स्पर्धा फिनलँडमध्ये घेतली जाणार होती. सदर स्पर्धा उपविभागीय युरोप अ आणि ब पात्र फेरीची स्पर्धा पुढील महिन्यात आयोजित केली होती. युरोप ब पात्र फेरीच्या स्पर्धेत यजमान फिनलँड, जर्मनी, जिब्राल्टर, ग्रीस, ग्युमेसी, हंगेरी, लक्झमबर्ग आणि स्वीडन या संघांचा समावेश होता. सदर स्पर्धा 30 जून ते 5 जुलै दरम्यान घेतली जाणार होती. या स्पर्धेनंतर तीन दिवसांच्या अंतराने अ पात्र फेरीची स्पर्धा आयोजित केली होती. आणि यामध्ये बल्गेरिया, सायप्रस, फ्रान्स, इस्त्रायल, इटली, माल्टा, नॉर्वे आणि स्पेन या संघांचा समावेश होता. ही स्पर्धा 13 जुलैला संपणार होती. त्यानंतर युरोप क पात्र फेरीची स्पर्धा बेल्जियममध्ये 5 ते 10 जुलै दरम्यान आयोजित केली होती. या स्पर्धेत ऑस्ट्रिया, बेल्जियम, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, आयल ऑफ मान, पोर्तुगाल, रोमानिया, सर्बिया हे संघ सहभागी होणार होते. पण आता युरोपमध्ये कोरोना महामारी समस्येमुळे आगामी आयसीसीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आयोजिलेल्या तीन उपविभागीय युरोप पात्र फेरीच्या स्पर्धा रद्द कराव्या लागत असल्याची माहिती आयसीसीचे स्पर्धा समितीचे प्रमुख ख्रिस टीटेली यांनी दिली आहे. क्रिकेट फिनलँड आणि बेल्जियम क्रिकेट फेडरेशन त्याचप्रमाणे सर्व सहभागी सदस्यांच्या सहकार्याबद्दल आयसीसीने धन्यवाद दिले. इटली, जर्मनी आणि डेन्मार्क या तीन संघांना आता आगामी होणाऱया युरोप उपविभागीय अनुक्रमे अ, ब, क पात्र फेरीच्या स्पर्धेतून आपली पात्रता सिद्ध करावी लागेल.
30 एप्रिल 2020 रोजी आयसीसीच्या टी-20 सांघिक मानांकनात इटली, जर्मनी आणि डेन्मार्क या संघांना स्थान देण्यात आले होते. आता स्पेनमध्ये 15 ते 21 ऑक्टोबर 2021 साली होणाऱया टी-20 विश्वचषक युरोप पात्र फेरीच्या स्पर्धेत या संघांचा जर्सीमध्ये समावेश केला जाईल. अ किंवा ब पात्र फेरी स्पर्धेतून दोन संघ पात्र ठरविले जातील. 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी दोन पात्र फेरीच्या स्पर्धाही लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. टी-20 विश्वचषक अमेरिका पात्र फेरीची स्पर्धा कॅनडामध्ये 17 ते 23 जुलै दरम्यान घेतली जाणार होती. या स्पर्धेत अर्जेंटिना, बहामास, बिलेझी, बम्युर्डा, केमन आयलंड्स, पनामा, आणि अमेरिका यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे आशिया ब पात्र फेरीच्या स्पर्धेत भुतान, चीन, मलेशिया, म्यानमार, हाँगकाँग, आणि थायलंड या संघांचा समावेश करण्यात आला होता. ही पात्र फेरीची स्पर्धा मलेशियात 11 ते 17 जुलै दरम्यान आयोजित केली होती. पण आता ही स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली आहे. सदर स्पर्धा मलेशियात 9 ते 15 नोव्हेंबर दरम्यान घेतली जाईल.
महिलांची टी-20 विश्वचषक आशियाई पात्र फेरीची स्पर्धा मलेशियात 22 ते 28 नोव्हेंबर दरम्यान घेतली जाणार असून यामध्ये भुतान, चीन, हाँगकाँग, कुवेत, म्यानमार, नेपाळ, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिरात या संघांचा समावेश राहिला.