वृत्तसंस्था/ कोलंबो
कोरोना महामारी समस्येमुळे श्रीलंकेतील प्रिमियर लिग टी-20 क्रिकेट स्पर्धा तिसऱयांदा लांबणीवर टाकण्याचा निर्णय स्पर्धा आयोजकांनी घेतला आहे. लंकेत पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या स्पर्धेतील ठिकाणांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही स्पर्धात तीन विविध ठिकाणांऐवजी एकाच ठिकाणी खेळविली जाणार आहे.
लंकेतील ही प्रिमियर लिग टी-20 क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. या स्पर्धेत एकूण 23 सामने खेळविले जाणार आहेत. विंडीजचा ख्रिस गेल, दक्षिण आफ्रिकेचा डु प्लेसिस, पाकचा शाहीद आफ्रिदी आणि विंडीजचा कार्लोस ब्रेथवेट या स्पर्धेत सहभागी होत आहेत. या स्पर्धेतील सर्व सामने बंदिस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकविना खेळविले जाणार आहेत. हंबनटोटा येथील स्टेडियममध्ये या स्पर्धेतील सर्व सामने होणार असून 17 डिसेंबरला अंतिम सामना खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लंकेतील ही स्पर्धा प्रथमच भरविली जात आहेत. सुरुवातीला सदर स्पर्धा ऑगस्टमध्ये आयोजित केली होती. पण कोरोनामुळे ती लांबणीवर टाकण्यात आली. 14 नोव्हेंबर रोजी ही स्पर्धा घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. पण आता पुन्हा ही स्पर्धा तिसऱयांदा लांबणीवर टाकण्यात आली असून सदर स्पर्धा 21 नोव्हेंबरपासून खेळविली जाईल. या स्पर्धेत सहभागी होणाऱया सर्व खेळाडूंना तसेच प्रशिक्षक वर्गाला 14 दिवसांसाठी सक्तीचे आयसोलेशन राहणार आहे.