जगभरात 53,26,230 बाधित : रशियात दिवसभरात 139 जणांचा मृत्यू : अन्य आजारांवरील उपाययोजनांना फटका
जगभरात आतापर्यंत 53 लाख 26 हजार 230 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 21 लाख 74 हजार 503 जणांनी कोरोनावर मात केली आहे. रशियात मागील 24 तासांत 9,434 नवे बाधित सापडले असून 139 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशातील एकूण रुग्णांचा आकडा 3,35,882 झाला आहे. तर बळींचा एकूण आकडा 3,388 वर पोहोचला आहे. अमेरिकेनंतर रशियातच सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.महामारीमुळे 8 कोटी नवजातांना योग्य मुदतीत लस मिळणे अवघड ठरू लागले आहे. जगभरातील आरोग्य व्यवस्थेलाच याचा फटका बसला आहे. महामारीमुळे डिफ्थेरिया, पोलियो आणि मीजल्स यासारख्या लसींचे वेळापत्रक कोलमडले आहे. संघटनेनुसार एक वर्षापेक्ष कमी वयाच्या मुलांना दिल्या जाणाऱया लसींचे काम जवळपास 68 देशांमध्ये रखडले आहे.
चीनमध्ये नवा रुग्ण नाही
कोरोना महामारी सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच चीनमध्ये एकही नवा बाधित आढळून आलेला नाही. कोरोना महामारीचा प्रारंभ चीनच्या वुहान शहरातूनच झाला होता. पहिला रुग्ण अधिकृतपणे 31 डिसेंबर रोजी सापडला होता. चीनमध्ये आतापर्यंत 4,634 जणांचा या संसर्गाने बळी घेतला आहे. तर 82 हजार 971 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
…धोकाच अधिक
कोरोना संसर्गादरम्यान हायड्रॉक्सी क्लोरोक्विन किंवा क्लोरोक्विन औषधाने लाभ होत नाही. याच्या वापराने मृत्युमुखी पडण्याचा धोका अधिक असल्याचा दावा लेंसेट जर्नलमध्ये प्रकाशित अध्ययन अहवालात करण्यात आला आहे. आपण हायड्रॉक्सी क्लोरोक्विन गोळय़ांचे सेवन करत असल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडेच दिली होती.
ब्राझीलः 20 हजार रुग्ण
दक्षिण अमेरिका आता महामारीचा नवा केंद्रबिंदू ठरला आहे. तेथे आतापर्यंत 5 लाख 80 हजार रुग्ण सापडले असून 29 हजार 444 जणांचा मृत्यू झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्टले आहे. तर ब्राझीलमध्ये मागील 24 तासांत 20 हजार 803 नवे रुग्ण सापडले असून 1001 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये 3,32,382 रुग्ण सापडले आहेत.
कॅनडात नवी मोहीम
कॅनडाचे सरकार प्रतिदिन महामारीने बाधित होणाऱया लोकांचा शोध लावण्यासाठी सज्ज आहे. सरकारने याकरता कर्मचाऱयांना प्रशिक्षित केले असून ते दिवसात 3,600 संपर्कातील व्यक्तींचा शोध लावू शकतात. याचबरोबर सांख्यिकी विभागाने 1,700 जणांना प्रशिक्षण दिले असून ते दिवसात 20 हजार जणांना शोध लावू शकतात अशी माहिती पंतप्रधान ट्रूडय़ू यांनी दिली आहे.
तुर्कस्तानात संकट
तुर्कस्तानात 24 तासांत 952 बाधित आढळून आले आहेत. 25 मार्चनंतर पहिल्यांदाच नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट दिसून आली आहे. बाधितांचा एकूण आकडा 1,54,500 झाला आहे. तर दिवसभरात 27 जणांचा मृत्यू झाल्याने बळींची एकूण संख्या 4,276 वर पोहोचली आहे. संकट ओसरू लागल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
युएई : 994 नवे रुग्ण
संयुक्त अरब अमिरातमध्ये (युएई) महामारीचे 994 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील एकूण बाधितांचा आकडा 27,892 झाला आहे. अनेक विदेशी नागरिकांमध्ये संसर्ग दिसून येत असला तरीही सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती युएईच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर एकूण बळींचा आकडा 241 वर पोहोचला आहे.
अमेरिका : दिवसात 1,260 बळी
अमेरिकेत 24 तासांत 1,260 जणांचा मृत्यू झाला असून 24 हजार 197 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील बळींचा एकूण आकडा 97,655 झाला आहे. तर एकूण बाधितांचे प्रमाण 16,45,353 वर पोहोचले आहे. कोरोना बाधितांचे प्रमाण अधिक असल्याने अमेरिकेतूनच यासंबंधीचे विस्तृत विश्लेषण जगासमोर येत आहे. अमेरिकेत होत असलेल्या संशोधनातून या संसर्गाचे स्वरुप तसेच त्यासंबंधी बचावाच्या उपाययोजना ठरविणे जगाला आता सोपे ठरत आहे.
14 दिवसांचे स्वयंविलगीकरण
8 जूनपासून ब्रिटनमध्ये दाखल होणाऱया प्रत्येकाला 14 दिवसांचे स्वयंविलगीकरण करावे लागणार आहे. या निर्णयाच्या कक्षेतून केवळ सूट मिळणाऱया व्यक्तींना बाहेर ठेवण्यात आले आहे. ब्रिटनच्या सरकारने प्रवासाशी संबंधित नवे नियम प्रसिद्ध केले आहेत. नियमांचा भंग करणाऱयांना दंड भरावा लागणार आहे. देशात आतापर्यंत 2,54,195 बाधित सापडले असून 36,393 जणांचा मृत्यू झाला आहे.