कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण आणि महानगर पालिका शिक्षण विभागाचा सर्व्हे
अहिल्या परकाळे / कोल्हापूर :
तीन ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांना कोणत्या व्याधी आहेत का? कोरोना संसर्गामुळे किती विद्यार्थ्यांनी आपले पालक गमावले आहेत. याचे सर्वेक्षण कोल्हापूर जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील 309 विद्यार्थ्यांनी आपले पालक गमावले आहे. यामध्ये काहींची आई तर काहींचे वडील तसेच काहींनी आई-वडील दोघांना गमावले आहे. या पोरक्या विद्यार्थ्यांचे पालकत्व कसे स्वीकारणार आणि शैक्षणिक सवलती कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आरोग्य विभागातील तज्ञांकडून वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या वतीने `माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ मोहीम राबवण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना कॅन्सर, मधूमेह, मुत्राशयाचे आजार, फुफुसाचे आजार, हृदयरोग, लठ्ठपणा, फिट्स, यकृतांचे आजार या व्याधी आहेत का? तसेच कोरोना संसर्गामुळे किती विद्यार्थ्यांनी पालक गमावले यासंदर्भातील माहिती संकलन करण्यात आली. यामध्ये काही विद्यार्थ्यांनी आई-वडील तर काही विद्यार्थ्यांनी आई किंवा वडील यापैकी एकाला गमावले आहे. कोरोना संकटात आकस्मिक निधन झाल्याने लहानपणीच जिल्हÎातील 309 विद्यार्थी पोरकी झाली आहेत. या पोरक्या विद्यार्थ्यांचे पालकत्व स्विकारणार, अशी घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली शिक्षण विभागाकडून सर्व माहिती संकलित केली आहे.
जिल्हा प्रशासनाकडे संकलित माहिती सादर
जिल्हा परिषद आणि महापालिका शिक्षण विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणाची एकत्रित माहिती शासनाकडे सादर करण्यात आली आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्याधीग्रस्त विद्यार्थ्यांसाठी 150 व्हेंटीलेटर बेडचे वेगळे कोरोना सेंटर उभारले जाणार आहे. त्याचबरोबर प्राथमिक स्वरूपात सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत औषधोपचारासह सर्वोत्परी मदत पोहचवली जाणार आहे.
विद्यार्थ्यांची माहिती शासनाकडे सादर
व्याधीग्रस्त व कोरोनात ज्या विद्यार्थ्यांनी पालक गमावले आहेत याचे सर्व्हेक्षण शासन आदेशानुसार करून, त्याचा डेटा शासनाकडे सादर केला आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाकडून मदतीसंदर्भात शासनाडून सकारात्मक निर्देश येतील त्याचे पालन करण्यात येईल.
शंकर यादव (प्रशासन अधिकारी, प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर महानगर पालिका)
तीन ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या
जिल्हा परिषदेच्या शाळा
शाळा | विद्यार्थी | पालकत्व गमावलेले विद्यार्थी |
1976 | 710935 | 169 |
महापालिका शाळा
शाळा | विद्यार्थी | पालकत्व गमावलेले विद्यार्थी |
298 | 137900 | 140 |