वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
गेल्या दोन महिन्यांपासून जगभर कोरोनाचा कहर सुरु असून गेल्या दोन महिन्यांमध्ये सुमारे 1.88 लाख कोटी रुपयांच्या विविध विभागातील ऑर्डर्स रद्द करण्यात आल्या आहेत. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनाझेशनचे महासंचालक अजय सहाय यांनी ही माहिती दिली आहे. याशिवाय देशातील प्रामुख्याने गारमेंट व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचे दिसत असून कपडे, लेदर वस्तु, हस्तकलेच्या वस्तु आणि कार्पेट याच्या निर्यातीवर 80 टक्के परिणाम झाला आहे.
कोरोनाचा प्रकार भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक सिद्ध होऊ लागला आहे. गेल्या सुमारे दोन महिन्यांच्या कालावधी 25 अब्ज डॉलर्स म्हणजे 1.88 लाख कोटी रुपयांच्या ऑर्डर्स विविध देशांनी रद्द केल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये जवळपास 30 कोटी रुपयांच्या कपडय़ांच्या ऑर्डर्स वाहतूक व्यवस्था नसल्याने या ऑर्डर्स ठप्प झाल्या आहेत. तर कारखाने बंद असल्याने तेथे पूर्णपूर्ण कामकाज बंद असल्याचाही कपडय़ांच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. या क्षेत्रातील अनेकांच्या नोकऱयांवरही टांगती तलवार आहे.
भारतातून जवळपास 50 ते 60 टक्के ऑर्डर्स आतापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत, असे सहाय यांनी सांगितले. यापुढेही कारखाने पूर्ण क्षमतेने सुरु होईपर्यंत या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. अनेक कारखानदारांना भविष्यात मोठय़ा आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. त्याशिवाय चीनच्या कारखानदारीचेही मोठे आव्हान भारतासमोर आहे, असे त्यांनी सांगितले.