ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना रुग्णांवर उपचार करणारे महाराष्ट्रातील 40 टक्के निवासी डॉक्टर्स मनोरुग्ण झाले आहेत. तसेच त्यांच्या मद्यपान आणि धुम्रपानाच्या व्यसनांमध्ये 30 टक्के वाढ झाल्याचा दावा इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागल्यापासून अनेक डॉक्टर्स आणि नर्स जवळपास 6 ते 7 महिने आपल्या कुटुंबापासून दूर आहेत. कार्यमग्न आणि तणावपूर्ण कार्यशैलीमुळे अनेक डॉक्टर मद्यप्राशन आणि धूम्रपान करतात. मात्र, करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे डॉक्टरांचा ताण वाढला. कोरोनाची भीती आणि कुटुंबियांपासून वियोग यामुळे त्यांच्यातील व्यसनांचे प्रमाण 30 टक्क्यांनी वाढले आहे.
अतिदक्षता विभागातील जवळपास 25 टक्के डॉक्टर आणि फिजिशियन तणावग्रस्त आहेत. त्यांना नैराश्य घालविण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावे लागत आहेत, असेही भोंडवे म्हणाले.