डॉ.अर्जुन म्हाडगूत यांना विश्वास : पुण्यातील जहांगिर रुग्णालयात कार्यरत : मूळचे कलंबिस्त येथील
सावंतवाडी
कलंबिस्त-गणशेळवाडी येथील डॉ. अर्जुन अशोक म्हाडगूत हे पुणे येथील जहांगिर हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांच्या सेवेत आहेत. सैनिकी स्कूलमधून शिक्षण घेऊन नंतर वैद्यकीय क्षेत्रात करिअर केलेल्या डॉ. अर्जुन यांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकायची आहे. ‘कोरोना’चा नाश होईल, त्या दिवसाची आम्ही वैद्यकीय क्षेत्रातील लोक वाट पाहत आहोत. तो दिवस निश्चित उजाडेल, असा विश्वास व्यक्त केला.
पुणे शहराला ‘कोरोना’ने ग्रासले आहे. आतापर्यंत पाच हजारहून अधिक कोरोनाबधित रुग्ण आढळले आहेत. पुणे येथील प्रसिद्ध जहांगिर हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून डॉ. अर्जुन दीड वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण कलंबिस्त गावातील मराठी शाळेत झाले.
आजोबा सेवानिवृत्त सैनिक, माजी सरपंच रामा म्हाडगूत व वडील हवालदार अशोक म्हाडगूत यांच्या सैनिकी बाण्यामुळे पाचवीपासूनच अर्जुन यांनी सैनिकी शिक्षणाचे धडे घेण्यासाठी आंबोली येथील सैनिकी स्कूलमध्ये प्रवेश घेतला. बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून नंतर पुणे येथील लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यानंतर पुणे येथील जहांगीर हॉस्पिटलमध्ये रुजू झाले.
फिजिकल डिस्टन्सिंग महत्वाचे!
डॉ. अर्जुन सांगतात, खरेतर ‘कोरोना’ला आपण सर्वजण हरवणारच आहोत. पण प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगपेक्षा फिजिकल डिस्टन्स पाळायला हवे. भारतीय संस्कृतीने दिलेले नियम पाळा. संस्कृती पाळली तर निश्चितच आपण कोरोनाला पळवून लावू. रोज वेळेवर घरचे जेवण, रात्रीची वेळीच झोप, विचार सकारात्मक ठेवायला हवेत. आजची तरुण पिढी रात्री वेळेत झोपत नाही. त्याचा परिणाम शरीरावर होतो.
रुग्णसेवेला प्राधान्य
पुणे येथील जहांगिर हॉस्पिटलमध्ये सुमारे दोन हजाराहून अधिक स्टाफ आहे. कोविड-19 साठी चार विभाग केले आहेत. रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याच्या लक्षणानुसार तपासणी करून त्याला त्या-त्या वॉर्डमध्ये दाखल केले जाते. कमी लक्षणे, सामान्य लक्षणे अन् आयसोलेशन असे वॉर्ड तयार करून रुग्ण दाखल केले जात आहेत. दाखल झालेल्या रुग्णांचा तपासणी अहवाल आल्यानंतर ते बाधित असले तर त्यांची दक्षता घेण्यात येते. आम्ही त्यांना धीर देण्याचेही काम करतो.
डॉ. अर्जुन सांगतात, सहा तास पीपीई किट घालून कोविड-19 रुग्णसेवेत राहावे लागते. रुग्णसेवा हेच दैवत आहे, असे आम्ही मानतो. दररोज पेशंट तपासणी अन् घरी येऊन आपले नित्याचे राहणीमान हे सर्व सांभाळताना दमछाक होते.
जिल्हा आरोग्य विभागाकडून निमंत्रण
डॉ. अर्जुन यांना सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाकडून कोविड-19 योद्धा म्हणून सेवेत या, असे निमंत्रण आले होते. मात्र, पुणे येथे कार्यरत असल्याने हे निमंत्रण स्वीकारले नाही, असे त्यांनी सांगितले.