ऑनलाईन टीम / पुणे :
शहरातील कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘माझा प्रभाग मी चौकीदार’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. भाजपच्या आढावा बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने चार सनदी अधिकाऱ्यांची खास पुणे शहरासाठी नियुक्ती केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहराची जबाबदारी सोपविण्यात आलेले साखर आयुक्त सौरभ राव, सहकार आयुक्त अनिल कवडे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग, भूजप सर्वेक्षण विभागाचे संचालक कौस्तुभ दिवेगांवकर आणि महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांच्यासमवेत भाजप पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ आदी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे खासदार गिरीश बापट आणि जगदीश मुळीक यांनी सांगितले.
यावेळी बापट म्हणाले, भाजप कार्यकर्ते गेल्या दोन महिन्यांपासून विविध सेवा उपक्रमातून नागरिकांना मदत करत आहेत. यापुढील काळात या उपक्रमांबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिकांचे प्रश्न आणि समस्या समजावून घेतील. प्रशासनाच्या साहाय्याने त्या सोडविण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात येणार आहे.
रुग्णांच्या घशातील द्रावाचे नमुने घेण्याचे प्रमाण वाढवावे, प्रतिबंधित क्षेत्र आणि सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र अशी निश्चित विभागणी करावी, विविध रुग्णालयातील खाटांची संख्येची माहिती उपलब्ध होण्यासाठी संगणक प्रणाली विकसित करावी, मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशकाच्या नियुक्त्या तातडीने कराव्यात, शहरी गरीब योजनेच्या नूतनीकरणाला मुदतवाढ द्याावी, शहरातील विकासकामे सुरू करावीत, नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी कालबद्ध कृती कार्यक्रम हाती घ्यावा,’ अशा मागण्या या बैठकीत करण्यात आल्याचे जगदीश मुळीक यांनी सांगितले.