ब्रिटनच्या टॉम डीनचा पराक्रम, 200 मीटर्स फ्री स्टाईलमध्ये सुवर्ण
ब्रिटनचा जलतरणपटू टॉम डीन एकदा नव्हे तर चक्क 2 वेळा कोरोनाबाधित होता. 2 वेळा कोरोनाचे संकट कोसळल्यानंतर तो ऑलिम्पिकसाठी नव्हे तर राष्ट्रीय निवड स्पर्धेसाठी तरी पात्र होईल का, याचीही खात्री नव्हती. पण, जिद्दी स्वभाव त्याला गप्प बसू देत नव्हता. त्याने नव्याने तयारी सुरु केली, तंदुरुस्त झाल्यानंतर कसून मेहनत घेतली आणि राष्ट्रीय स्पर्धेपाठोपाठ ऑलिम्पिक पात्रता मिळवून ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकण्यातही तो यशस्वी ठरला. त्याने 200 मीटर्स फ्री स्टाईलचे सुवर्ण जिंकले. या गटात त्याचाच राष्ट्रीय सहकारी डंकन स्कॉट रौप्य पदकाचा मानकरी ठरला.
‘माझ्या कारकिर्दीतील ही सर्वात मोठी कामगिरी आहे’, असे डीन यावेळी म्हणाला. एखाद्या जलतरण इव्हेंटमध्ये पहिली दोन्ही पदके जिंकण्याची ब्रिटनसाठी ही 100 वर्षातील पहिलीच वेळ ठरली. यापूर्वी 1908 लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रिटनने असा पराक्रम गाजवला होता.
वास्तविक, प्रतिकूल स्थिती पाहता, जानेवारीत तो पोहू शकेल का, याचीही खात्री नव्हती. 4 महिन्यात 2 वेळा कोरोना झाल्याने त्याची बरीच घुसमट झाली. खोकला थांबत नव्हता. अपार्टमेंटमध्येच क्वारन्टाईन व्हावे लागल्याने त्याच्या सरावातही खंड पडला. एप्रिलमधील ट्रायल्स केवळ तीनच महिन्यावर होते. साहजिकच, ऑलिम्पिक पदक त्याच्यापासून लाखो कोस दूर होते. पण, तरीही सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न साकारता आले, याचा त्याने आनंद व्यक्त केला.
आपल्या या यशाचे श्रेय तो प्रशिक्षक डेव्हिडना प्रामुख्याने देतो. 21 वर्षीय डीनला कोरोनाच्या या दुहेरी संकटामुळे ऑलिम्पिक पदार्पणाची संधी हुकेल, असेच वाटत होते. मात्र, प्रशिक्षक डेव्हिड मॅकनल्टीनी त्याचे मनोबल उंचावले.