डेक्सामेथासोन अत्यंत उपयुक्त : ब्रिटनमध्ये संशोधन : गंभीर रुग्णांचा मृत्यूदर घटविणे शक्य
वृत्तसंस्था/ लंडन
कोरोना महामारीवरील लसीसंदर्भात संशोधन करणाऱया ब्रिटिश वैज्ञानिकांनी या धोकादायक विषाणूच्या संसर्गापासून रुग्णांना वाचविणारे औषध हाती लागल्याची घोषणा केली आहे. डेक्सामेथासोन नावाच्या स्टेरॉइडच्या वापरामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांचा मृत्यूदर एक तृतीयांश प्रमाणात घटला आहे. डेक्सामेथासोन औषध रुग्णांना केवळ 10 दिवसांपर्यंत दिले जाते. या औषधाची प्रतिरुग्ण किंमत केवळ 481 रुपये आहे.
डेक्सामेथासोन औषध जागतिक आरोग्य संघटनेच्या आवश्यक औषधांच्या यादीत 1977 पासून नोंदणीकृत आहे. डेक्सामेथासोन एक स्टेरॉइड असून त्याचा वापर श्वसनाची समस्या, ऍलर्जिक रिऍक्शन, ऑर्थरायटिस, हार्मोन किंवा इम्युनिटी सिस्टीम डिसऑर्डर आणि सूजेवरील उपचारासाठी केला जातो. हे औषध शरीराचा नॅचरल डिफेन्सिव्ह रिस्पॉन्स देखील कमी करते.
वैज्ञानिकांचा दावा
हे औषध 2104 रुग्णांना देण्यात आले आणि त्याची तुलना सर्वसाधारण पद्धतीने उपचार सुरू असलेल्या 4321 अन्य रुग्णांची करण्यात आली. औषधाच्या वापरानंतर व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचा मृत्यूदर 35 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. तर प्राणवायू सहाय्यावर असलेल्या रुग्णांमधील मृत्यूदर 20 टक्क्यांनी कमी झाल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
डब्ल्यूएचओकडून कौतुक
जागतिक आरोग्य संघटनेने ब्रिटिश वैज्ञानिकांच्या या अध्ययनाचे कौतुक केले आहे. डेक्सामेथासोनवर झालेल्या अध्ययनाचे स्वागत करतो. या औषधामुळे मृत्यूदरात घट होऊ शकते. जीव वाचविणे आणि संसर्ग फैलावण्यापासून रोखण्यावर लक्ष द्यावे लागणार असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.
औषध अत्यंत स्वस्त
नवे संशोधन उत्साह वाढविणारे ठरले आहे. कोरोना महामारीचा मृत्यूदर कमी करणे आणि प्राणवायू सहाय्यावर असलेल्या गंभीर रुग्णांना याचा स्पष्टपणे लाभ झाला आहे. याच कारणामुळे अशा रुग्णांवर डेक्सामेथासोनचा वापर केला जावा. डेक्सामेथासोन औषध महागडे देखील नाही आणि जगभरात जीव वाचविण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. जगभरात हे औषध उपलब्ध असल्याचे विधान ऑक्सफोर्ड विद्यापीठातील संशोधन पीटर होर्बी यांनी केले आहे.