ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोनावरील प्रतिपिंड उपचार सर्वांना मोफत दिले जातील, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.
राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विस्कॉन्सीनमधील आयोजित सभेत ट्रम्प बोलत होते. ट्रम्प म्हणाले, अमेरिकेत कोरोनाची परिस्थिती भीषण आहे. आपण ही परिस्थिती योग्य प्रकारे हाताळत आहोत. मात्र, नोव्हेंबरमधील निवडणुकीत जो बायडेन विजयी झाले तर देशातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाईल. आर्थिक घडी सावरण्याची प्रक्रिया विस्कळीत होईल. बायडेन लस आणण्यास उशीर करतील आणि जागतिक साथ दीर्घ काळासाठी वाढवतील.
ज्यांचे वय कमी आहे, असे बाधित रुग्ण लवकर बरे होऊ शकतात. पण वृद्धांना कोरोनामुळे बरे व्हायला वेळ लागतो. किंबहुना काही रुग्णांचा कोरोनाने मृत्यूही होतो. अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या 83 लाखांवर पोहचली आहे. तर मृतांचा एकडा सव्वा दोन लाखांसमीप आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिपिंड ही सर्वोत्तम गोष्ट आहे. ते प्रत्येकाला मोफत उपलब्ध करून दिले जाईल.