ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
‘मोलनुपिरावीर’ हे कोरोनावरील सर्वात स्वस्त औषध मॅनकाईंड फार्मा कंपनी या आठवडय़ामध्ये लाँच करणार आहे. या औषधाच्या एका गोळीची किंमत 35 रुपये असणार आहे. डीसीजीआयने काही दिवसांपूर्वीच आपत्कालीन वापरासाठी या औषधाला परवानगी दिली आहे. मॅनकाईंड फार्माचे चेअरमन आर. सी. जुनेजा यांनी यासंदर्भात माहिती दिली.
कोरोना महामारीविरोधातील लढाईला बळ देण्यासाठी मॅनकाईंड फार्मा या कंपनीकडून मोलनुपिरावीर या औषधाचे लाँचिंग करण्यात येणार आहे. एकूण 13 देशांमध्ये या औषधाचे उत्पादन सुरू आहे. सहव्याधी असलेल्या प्रौढ रुग्णाला हे औषध देण्यात येते. भारतात सिप्ला कंपनी सिपमोलनू या नावाने या औषधाचे उत्पादन घेत आहे. तर सनफार्मा, डॉ. रेड्डीज, नेटको, माइलान आणि हेटेरो कंपनीही या औषधाचे उत्पादन करत आहे. एका रुग्णाणसाठी मोलनुपिरावीर हे औषध पाच दिवसांपर्यंत दररोज दोन वेळा 800 मिलिग्रॅम रेकमेंड करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत एका रुग्णाला 200 मिलिग्रॅम औषध म्हणून 40 गोळय़ा घेण्याची गरज आहे.
डीसीजीआयने या औषधाची निर्मिती आणि मार्केटिंगला परवानगी देणाऱया पत्रामध्ये म्हटले आहे की, तीन महिन्यांच्या आत औषधाच्या क्लीनिकल ट्रायलची अपडेट डिटेल्स द्यावी लागतील. त्यामुळे या औषधाच्या परीक्षणासाठी एक हजार रुग्णांवर चाचणी करण्यात येणार आहे.