ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पतंजली लवकरच कोरोनावर आयुर्वेदिक लस आणणार असल्याचे योगगुरू बाबा रामदेव यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
जगभरात कोरोना लस आणि औषधांवर संशोधन सुरू आहे. काही संस्थांच्या लसीच्या चाचण्या दुसऱ्या टप्प्यात येऊन पोहचल्या आहेत. दोन ते तीन महिन्यात या चाचण्या कोरोना प्रतिबंधासाठी यशस्वी ठरल्या की नाही, ते स्पष्ट होईल. असे असतानाच बाबा रामदेव यांनी आपल्याकडे कोरोनावर औषध उपलब्ध असल्याचा दावा केला आहे.
कोरोना विषाणू माणसाच्या शरीरात गेला की तो शरीराची संपुर्ण रचना बिघडवतो. शरीरातील पेशींवर त्याचा जास्त परिणाम होतो. यावर आयुर्वेदातील गिलोय आणि अश्वगंधा हे परिणामकारक आहेत. या औषधांचा वापर करून पतंजलीने काही औषधे तयार केली असून, त्याच्या चाचण्या सुरू आहेत. लवकरच याचे रिझल्ट सर्वांसमोर येतील, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.