ऑनलाईन टीम/तरुण भारत
जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे नवीन व्हेरिएंट देखील नागरिकांची चिंता वाढवत आहेत. सध्या तरी केवळ लसीकरणामुळे माणूस कोरोनापासून सुरक्षित राहू शकतो. याशिवाय औषध निर्मिती आणि लसींची निर्मिती जगभरात सुरू आहे. या सर्व परिस्थितीमध्ये अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) बुधवारी मोठा निर्णय घेतला. एफडीएने कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी १२ वर्षे वयोगटातील आणि त्याहून अधिक वयाच्या जोखीम असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी फायझरच्या Paxlovid गोळीला मान्यता दिली आहे. या औषधाची २२०० लोकांवर चाचणी करण्यात आली. जोखीम असलेल्या लोकांमध्ये या औषधाने हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूचा धोका ८८ टक्क्यांनी कमी केल्याचे दिसून आले. फायझरच्या या उपचारांना यापूर्वी युरोपियन युनियनमध्ये मान्यता दिली गेली आहे.