कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील स्थिती
एकाच इमारतीत कोविड आणि नॉनकोविड रुग्णांवर उपचार
रुग्णांसह कर्मचाऱयांनाह कोरोनाचा धोका
गेल्या काही दिवसांत दहा कर्मचारी पॉझिटिव्ह
स्वप्नील वरवडेकर / कणकवली:
कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी ‘डीसीएचसी’ (डेलिकेटेड कोविड हेल्थ सेंटर) कार्यान्वित आहे. मात्र, रुग्णालयाच्या एकाच इमारतीत कोविड व नॉनकोविड रुग्णांवर उपचार सुरु आहेत. परिणामी, येथील नॉनकोविड रुग्णासह रुग्णालयीन कर्मचाऱयांनाही कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. साहजिकच येथे एका बाजूला गंभीर कोरोनाग्रस्तांवर उपचार केले जात असतानाच दुसऱया बाजूला कोरोनाला निमंत्रणही मिळत असल्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांत रुग्णालयातील दहा कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सीसीसी, डीसीएचसी व डीसीएच अशा स्वरुपात कोविड सेंटर कार्यान्वित करण्यात आली. ‘सीसीसी’मध्ये सामान्य कोविड रुग्णांवर, ‘डीसीएचसी’मध्ये गंभीर कोविड रुग्णांवर तर ‘डीसीएच’मध्ये अतिगंभीर कोविड रुग्णांवर उपचार केले जातात. त्यानुसार ओरोस जिल्हा रुग्णालय हे ‘डीसीएच’ प्रकारात असून सावंतवाडी, शिरोडा व कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर ‘डीसीएचसी’ प्रकारातील आहेत.
‘डीसीएससी’च्या नजीकच डायलेसीस!
कणकवली रुग्णालय येथील अतिदक्षता विभागामध्ये हा ‘डीसीएचसी’चा प्रभाग सुरु करण्यात आला. दुर्दैव म्हणजे याच प्रभागाच्या बाजूला डायलेसीस सेंटर आहे. दहा बेडचा हा ‘डीसीएचसी’ प्रभाग कार्यान्वित झाल्यापासून आजतागायत सातत्याने फुल्ल राहिला आहे. त्याच प्रभागात ‘ऍडजस्टमेंट’ करून आणखी तीन – चार रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
अन्य वॉर्डमध्येही कोरोनाचे रुग्ण
दुर्दैव म्हणजे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णालयातील ‘फिमेल वॉर्ड’मध्येही कोरोनाचे रुग्ण ठेवण्यात येत आहेत. रुग्णालयात कुठल्याही तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराकडेच असणाऱया अपघात विभागाच्या वॉर्डामध्ये दाखल केले जाते. पण, कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने व ओरोसमध्ये बेड उपलब्ध नसल्याच्या कारणास्तव काही रुग्णांवर अपघात विभाग वॉर्डमध्येच उपचार केले जात आहेत.
नॉनकोविड रुग्णांना कोरोनाचा धोका!
कणकवली हे जिल्हय़ातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णसंख्याही मोठी आहे. कणकवली, देवगड, मालवण, वैभववाडी, अगदी नजीकच्या राजापूर व राधानगरी येथील रुग्णही येथे उपचारासाठी येत असतात. मध्यंतरी ओरोस रुग्णालयात फक्त कोविडच्या रुग्णांवर उपचार केले जात होते. परिणामी, कणकवली रुग्णालयातील रुग्णसंख्या आणखीनच वाढली. तरिही एकाच इमारतीत कोविड व नॉनकोविड रुग्णांवर उपचार केले जात असल्यामुळे अन्य आजारांच्या रुग्णांमधून भीतीचा सुर उमटत आहे. बऱयाचदा अपघात विभाग वॉर्डमध्ये कोरोनाचे रुग्ण असतात, त्याच्या बाजूला अन्य आजारांचे रुग्णही उपचार घेत असतात.
रुग्णालयाचे कर्मचारी निघताहेत पॉझिटिव्ह
कोविड – नॉनकोविड रुग्णांची सरमिसळ झाल्याची परिणीती चक्क रुग्णालयीन कर्मचारीच कोरोनाच्या विळख्यात सापडण्यात होत आहे. मागील काही दिवसांत रुग्णालयाचे दहा कर्मचारी कोरोनाग्रस्त झाले आहेत. यात चार नर्स, चार सफाई कामगार व दोन टेक्निशियनचा समावेश आहे. सध्या स्वॅब कलेक्शन सेंटरही कणकवली रुग्णालयातच असून ‘स्वॅब टेस्ट’ घेणारा एक कर्मचारीही कोरोनाग्रस्त झाला आहे.
कर्मचाऱयांमध्ये भीतीचे वातावरण
‘डीसीएचसी’मध्ये स्वतंत्र कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, एकच इमारत असल्याने सर्वांच्या येण्या-जाण्याची वाटही एकच आहे. तर अन्य प्रभागांमध्येही कोरोनाचे रुग्ण ठेवले जात असल्याने प्रत्येक प्रभागात वावरताना कर्मचाऱयांच्या मनामध्ये कोरोनाची दहशत दिसत आहे. याबाबत प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कर्मचाऱयांमधून होत आहे.
‘डीसीएचसी’ स्वतंत्र करा
सद्यस्थितीत जिल्हय़ातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत कणकवली तालुक्यातील रुग्णसंख्या जास्त आहेत. साहजिकच कणकवलीत मोफत उपचार होणाऱया सक्षम कोविड सेंटरची गरज आहेच. पण, एकाच इमारतीमध्ये कोविड व नॉनकोविड रुग्णांवर उपचार करण्यापेक्षा कोविड रुग्णांची अन्यत्र व्यवस्था करावी, अशी मागणी रुग्ण व नागरिकांमधून होत आहे.