दिलासा मिळाल्याची भावना, औषधाच्या किमतीसंबंधी चर्चा, जगभरात कोरोना रूग्णांची संख्या 1 कोटी 80 लाखांहून अधिक
जगाला विळखा घातलेल्या कोरोना विषाणूवर प्रभावी लस निर्माण करण्याचे प्रयत्न होत असतानाच, या संसर्गावर औषध सापडल्याचा दावा अमेरिकेच्या संशोधकांनी केला आहे. हे औषध मुख्यतः सार्स या आजारावर असले तरी ते कोणत्याही कोरोना विषाणूच्या संसर्गावर चालू शकते, असे आढळले आहे.
या औषधाचा अहवाल ‘सायन्स’ या विज्ञानविषयक नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. प्रथिनाच्या स्वरूपातील हे औषध कोरोना विषाणूंचे पुनरूत्पादन रोखण्यास समर्थ आहे. त्यामुळे या विषाणूंची वाढ खुंटते आणि कालांतराने ते नाहीसे होतात. या औषधाचे कोणतेही घातक दुष्परिणाम शरीरावर होत नाहीत, असेही निरीक्षणातून आढळून आले आहे. मात्र, या औषधाच्या मोठय़ा प्रमाणावरील उत्पादनाला अद्याप किती वेळ लागू शकतो, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.
संशोधनाला वेग
कोरोना विषाणूवरील लस आणि औषध शोधण्यासाठी आता जगभरात जोरदार प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत केवळ लस बनविण्यात मोठी प्रगती केल्याचे दावे केले जात होते. तथापि, आता औषधावरही संशोधनाचे अहवाल प्रसिद्ध होत आहेत. कान्सास प्रांत विद्यापीठाच्या संशोधकांनी हे औषध शोधल्याची माहिती देण्यात आली आहे. या औषधाचे मर्यादित प्रमाणात प्रयोग करण्यात आले असून ते यशस्वी ठरले आहेत. नजीकच्या भविष्यकाळात या औषधावर अधिक प्रयोग करून ते जास्त प्रभावी बनविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
उंदरांवर प्रयोग यशस्वी
कोरोनावर औषध म्हणून विकसित करण्यात आलेल्या या प्रथिनांच्या रेणूंचे प्रयोग प्रथम उंदरांवर करण्यात आले. कोरोनाबाधित उंदराला हे औषध दिल्यानंतर त्याच्या शरीरातील विषाणूंची संख्या वाढणे बंद झाले. प्रथिनाचा हा रेणू कोरोनाच्या पुनरूत्पादन क्षमतेवरच आघात करतो. त्यामुळे कोरोना विषाणूच्या पुढच्या पिढय़ा आपल्या शरिरात निर्माण होणे रोखले जाते. परिणामी, विषाणूंची संख्या कमी होऊन आपल्या शरिरातील पेशी या कमी संख्येने असलेल्या विषाणूंचा सक्षमपणे प्रतिकार करू शकतात, असे या औषधाच्या संशोधकांचे म्हणणे आहे.
जुन्या औषधांवरही प्रयोग
विषाणूंच्या संसर्गावर पूर्वी उपयोगात आणली जाणारी, पण नंतर कालबाहय़ ठरविण्यात आलेली औषधे आजही प्रयोगाधीन आहेत. या औषधांच्या रेणूंमध्ये विशिष्ट प्रकारे परिवर्तन करून कोरोनावर उपयुक्त औषध शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. आगामी काळात त्याला यश मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या औषध शोधण्याच्या कार्यात अमेरिका आणि फ्रान्स ही राष्ट्रे आघाडीवर आहेत. तसेच भारतातही काही कंपन्या असे प्रयोग करीत आहेत.
फेव्हिपिरावीर प्रभावी
सध्या कोरोनावर फेव्हिपिरावीर हे औषध सर्वात प्रभावी मानले जात आहे. या औषधाने सैम्य ते तीव्र स्वरूपाचा कोरोना संसर्ग आटोक्यात येऊ शकतो. मात्र, या औषधाचा खात्रीशीर परिणाम सर्वच रूग्णांवर होईल याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे नव्या औषधांचा शोध घेण्यावर संशोधक लक्ष केंद्रीत करीत आहेत. त्याच प्रयत्नातून औषधी प्रथिनांचा हा रेणू विकसित करण्यात आला आहे. हे औषध लवकरात लवकर उत्पादनाच्या पातळीपर्यंत जावे अशी साऱयांची इच्छा असणार हे निश्चित आहे. आम्ही त्यानुसार प्रयत्नशील आहोत, असे संशोधकांनी स्पष्ट केले.
50 लाखाचा आकडा पार
दक्षिण अमेरिकेत कोरोना बाधितांच्या एकंदर संख्येने 50 लाखांचा आकडा पार केला आहे. दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये कोरोना संसर्गाच्या संदर्भात ब्राझील सर्वात आघाडीवर असून तेथे चाळीस लाखांहून अधिक रुग्ण आहे. या खंडाची लोकसंख्या 64 कोटी असून कोरोना संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा आरोग्य तज्ञांनी दिला आहे. या खंडात आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांचा कोरोना महामारीमुळे मृत्यू ओढवलेला आहे.
पुन्हा लॉकडाऊन
फिलिपाईन्स देशाच्या सरकारने कोरोना रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करण्याचा अदेश दिला आहे. राजधानी मनिलाच्या काही भागांमध्ये मंगळवारपासून अनेक बाजारपेठा बंद करण्यात आल्या असून सरकारी कार्यालयांमध्ये उपस्थितीवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. परिणामी, आर्थिक व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नवा लॉकडाऊन पूर्वीपेक्षा सौम्य आहे.
सेनाप्रमुखांना कोरोना
ब्राझीलचे सेनाप्रमुख वॉल्टर सोऊझा ब्रागा नेटो यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. नेटो हे देशाचे संरक्षणमंत्रीही आहेत. त्यांच्यासह ब्राझीलच्या सात मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या आठवडय़ात या देशाचे प्रमुख जाईर बोल्सोनारो यांच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा झाली होती. या देशात कोरोनाचे रूग्ण झपाटय़ाने वाढत आहेत.
चिंताजनक स्थिती
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाची स्थिती अधिकच चिंताजनक होत आहे. रुग्णसंख्या प्रतिदिन सरासरी 2000 ने वाढत असून सरकारी रुग्णालयांना व्हेंटिलेटर्सचा तुडवडा जाणवत आहे. कोरोनाचे पुढचे लक्ष्य आफ्रिका खंड हेच प्रामुख्याने असेल असा इशारा जागतिक तज्ञांनी दिला असूनही अद्याप या खंडातील अनेक देशांनी तो गंभीरपणे घेतलेला नाही, अशी तक्रार जागतिक आरोग्य संघटनेने केली.
पालकांचा विरोध
विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्यावरून सध्या अमेरिकेच्या काही प्रांतांमध्ये पालक आणि प्रशासन यांच्यात वाद भडकला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होईपर्यंत शाळा सुरू करू नयेत असे निवेदन पालकांच्या अनेक संघटनांनी प्रशासनांना दिले आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेची काळजी घेऊन शाळा सुरू करण्याचा प्रशासनांचा विचार आहे. पालकांना शिक्षकांचाही पाठिंबा मिळत आहे.
हाँगकाँग सावरले
हाँगकाँग मधील कोरोना रुग्णसंख्या झपाटय़ाने कमी होत आहे. तसेच नव्या रूग्णांची भर पडण्याचे प्रमाणही कमी होत आहे. हाँगकाँगच्या स्थानिक प्रशासनाने कठोर निर्बंध घातल्याचा परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. चीनच्या मुख्य भूमीतही नव्या रूग्णांच्या संख्येत घट झाली असून अनेक भागांमधील परिस्थिती नियंत्रणात आल्याचा दावा करण्यात आला.