कोरोना हा तसा सौम्य विकार असला तरी काही जणांसाठी ते जीवावरचे दुखणे ठरत आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर काहीजणांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण अचानक कमी होते आणि ते अत्यवस्थ होतात. अमेरिकेतील एक मोनिका नामक नर्सची अशाच प्रकारे मृत्यूशी झुंज चालली होती. कोरोनामुळे ती आठ दिवस बेशुद्धावस्थेत (कोमात) होती. तथापि, एक वेगळेच ‘औषध’ तिच्या साहाय्याला आले आणि त्यामुळे तिचा जाणारा जीव वाचला.
31 ऑक्टोबरला तिचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक आल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाहता पाहता तिची प्रकृती खालावत गेली. अखेर पाच दिवसांनी ती बेशुद्ध पडली, तशा अवस्थेत आठवडाभर तिने काढला. उपचार सुरुच होते. तिला शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टर्स उपयांची शर्थ करीत होते. पण यश येत नव्हते, अखेर शेवटचा उपाय म्हणून तिला कामभावना उद्दिपित करणारे औषध म्हणून जगात परिचित असलेले व्हायग्रा देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा उपाय तसा धोक्याचा होता. कारण कोरोना रुग्णांना तो कितपत मानवतो याविषयी फारशी माहिती किंवा आकडेवारी उपलब्ध नाही.
तरीही धाडसाने हा निर्णय घेण्यात आला. व्हायग्रामुळे तिच्या शरीरातील रक्तप्रमावह वेगाने वाहून तिला जीवदान मिळू शकेल असे तर्कशास्त्र या निर्णयामागे होते. सुदैवाने तसेच घडले. व्हायग्रा सलाईनमधून तिच्या रक्तात सोडल्यानंतर काही वेळातच ती शुद्धीवर आली. आता तिची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले आहे. तिला व्हायग्रा देण्याचा जेव्हा निर्णय झाला तेव्हा अनेक तज्ञांनी त्याला विरोध केला होता. तसेच अनेकांनी त्यावर चेष्टा विनोदही केले होते. कारण व्हायग्रा हे औषध एका ‘विशिष्ट’ कारणासाठी दिले जाते. तथापि, हा उपाय आश्चर्यकाररित्या प्रभावी ठरल्याने आता त्यावर गांभीर्याने संशोधन हाती घेण्यात आले आहे. ते यशस्वी झाल्यास कोरोनावर आणीबाणीच्या प्रसंगी करावयाचा उपाय म्हणून व्हायग्रा प्रसिद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.