‘ग्लेनमार्क’कडून फैबी फ्लू ब्रँडअंतर्गत औषध सादर : वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसारच उपलब्ध होणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जगभरात कोरोनावर लस शोधण्याचे काम हे युद्धपातळीवर सुरू असतानाच भारतात ‘फेविपिरावीर’ या गोळय़ांचा वापर कोरोनावरील इलाजासाठी केला जाणार आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने या औषधाची निर्मिती केली आहे. या अँटिव्हायरल गोळय़ांचे नाव ‘फेविपिरावीर फॅबी फ्लू’ असे आहे. ‘डीजीसीआई’ने या औषधाच्या उत्पादनाला आणि विक्रीला परवानगी दिली आहे, अशी माहिती कंपनीने दिली. या औषधाच्या एका गोळीची किंमत ही 103 रुपये इतकी आहे.
कोरोनावरील औषधोपचारांचे अमेरिकेतील काही कंपन्यांकडून वेगाने संशोधन सुरू आहे. तसेच अन्य देशही बरेच प्रयत्न करत आहेत. मात्र, आतापर्यंत कोणतेही प्रभावी औषध सापडलेले नाही. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी फेविपिरावीर औषध परिणामकारक ठरेल, असा दावा ग्लेनमार्क फार्माने केला आहे. ग्लेनमार्कने फैबी फ्लू या ब्रँडअंतर्गत फेविपिरावीर औषध सादर केले आहे. फेविपिरावीरचे उत्पादन आणि विक्री करण्याची परवानगी भारतीय औषध महानियंत्रकाने ग्लेनमार्क फार्माला दिली आहे. त्यामुळे लवकरच हे औषध बाजारात उपलब्ध होणार आहे. कोरोना रोखण्यासाठी पहिल्यांदाच एखाद्या औषधाला सरकारने मान्यता दिली आहे. तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे औषध उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
‘रेमडेसिवीर’ निर्मितीलाही परवानगी?
कोरोना विषाणूवर प्रभावी ठरणाऱया ‘रेमडेसिवीर’ औषधाचेही आता भारतात उत्पादन होणार आहे. तसेच त्याच्या विक्रीलाही अनुमती मिळण्याचे संकेत आहेत. भारताच्या औषधी महानियंत्रक विभागाने रेमडेसिवीर औषधाच्या उत्पादनासाठी हेटेरो आणि सिप्ला या दोन कंपन्यांना परवानगी दिली असल्याचे वृत्त आहे. भारतातच त्याचे उत्पादन होणार असल्याने कोरोना रुग्णांसाठी ही बाब दिलासा देणारी आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवरच वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसारच हे औषध वापरण्यात येणार आहे.