कोरोनावर यशस्वी मात करणाऱ्या 87 वयाच्या वृद्धासह 6 जणांना डिस्चार्ज ; कराडसह वाळवा, कडेगाव तालुक्याला दिलासा
कराड / प्रतिनिधी
जिल्ह्यात रोज नवनव्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याच्या बातम्यांमुळे भयग्रस्त व हवालदिल झालेल्या कराड तालुकावासीयांसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. आज कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 6 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, यामध्ये 87 वर्षीय वृद्धाचा आणि 3 वर्षीय बालकाचाही समावेश आहे. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 12 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, कोरोनाविरुद्धच्या लढाईत कृष्णा हॉस्पिटलकडून होत असलेल्या नेत्रदीपक कामगिरीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
सर्दी, ताप अशी लक्षणे असलेली आगाशिवनगर येथील 87 वर्षीय वृद्ध व्यक्ती, तसेच मूळ कडेगाव तालूक्यातील येतगाव येथील पण सध्या आगाशिवनागर येथे राहणारा 33 वर्षीय युवक, वनवासमाची येथील 3 वर्षीय मूल आणि 57 वर्षीय गृहस्थ, तसेच रेठरे बुद्रुक येथील 42 वर्षीय गृहस्थ आणि वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील 48 वर्षीय गृहस्थ यांना 23 एप्रिल रोजी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या सर्व रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर हॉस्पिटलमधील विशेष कोरोना वॉर्डमध्ये उपचार सुरू करण्यात आले.
कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर्स करत असलेल्या उपचारामुळे आणि नर्सिंग स्टाफकडून घेतल्या जात असलेल्या विशेष काळजीमुळे कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. आत्तापर्यंत हॉस्पिटलमधून तांबवे, म्हारुगडेवाडी, डेरवण, ओगलेवाडी, बाबरमाची, चरेगाव येथील 6 कोरोनामुक्त रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज करण्यात आले. यात सातत्य राखत कृष्णा हॉस्पिटलमधील यशस्वी उपचारामुळे आज आणखी 6 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन, कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वीपणे लढल्याबद्दल कोरोनामुक्त रुग्णांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.