महापालिकेचे ` आता एकच मिशन – 100 टक्के लसीकरण’ : आयुक्त कादंबरी बलकवडे यांची संकल्पना
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने कंबर कसली आहे. संकल्प विद्यार्थ्यांचा कोरोना विरुध्द लढाईचा, “आता एकच मिशन 100 टक्के लसीकरण” या उपक्रमागर्तंत महापालिकेने शहरातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या नातेवाईक, मित्रपरिवारापर्यत पोहचण्याची मोहीम आखली आहे. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेण्यात येणार आहे. महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ. कादंबरी बलवकडे यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱयांचाही सहभाग असणार आहे.
महापालिका आणि प्राथमिक शिक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात शनिवारी आयोजित कार्यक्रमात शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या हस्ते या मोहिमेची सुरूवात करण्यात आली. महापालिका उपायुक्त रविकांत आडसुळ आणि प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी शंकर यादव यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आमदार आसगांवकर यांनी कोरोना लसीकरणाबद्दल असलेली भीती व गैरसमज दूर करावेत असे आवाहन केले. माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, डॉ. अमोल माने, यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. अमोल माने, मुख्य लिपिक राजीव साळोखे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रसुल पाटील, पर्यवेक्षक विजय माळी, उषा सरदेसाई, बाळासाहेब कांबळे, जयदीश ठोंबरे, अजय गोसावी, अविनाश लाड, सचिन पांडव, राजाराम शिंदे, शांताराम सुतार तसेच प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन आर.जी.कांबळे यांनी केले. आभार संकल्प माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश सुतार यांनी मानले.
अशी आहे मोहीम आणि संकल्प
उपायुक्त रविकांत आडसुळ यांनी मोहिमेची माहिती दिली. ते म्हणाले, कोरोना रोखण्यासाठी सर्वांचे लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन व शाळा पुन्हा बंद करावयाची वेळ येऊ नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आवश्यक आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शंभर टक्के लसीकरणासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मोहीम राबविण्याचे नियोजन आहे. शहरातील इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक, मित्र परिवारामधील 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व व्यक्तींचे लसीकरण आवश्यक आहे. त्याकरिता मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांकरवी प्रत्येक कुटुंबात जागृती करावी. शाळांना दिलेले संकल्पपत्र विद्यार्थ्यांकडून भरुन घ्यावे व लस न घेतलेले पालक, नातेवाईक व मित्र परिवार यांची यादी तयार करुन द्यावी. त्यानुसार शाळास्तरावर कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत मोफत लसीकरणाचे नियोजन करण्यात येईल. जागेवरच नोंद घेवून रजिस्ट्रेशन करुन लगेच लसीकरण करण्यात येईल. कुटुंबातील ज्या वयोवृध्द, आजारी व्यक्ती केंद्रापर्यत येवू शकणार नाहीत, त्यांचे घरी जावून लसीकरण केले केले जाईल, असे उपायुक्त आडसूळ यांनी सांगितले.
कोरोनाविरूद्ध लढ्याच्या या मोहिमेत प्रत्येक विद्यार्थ्याचा सहभाग हा राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पाहिला जाईल. शहरातील 296 शाळा, कनिष्ठ महाविद्यायलतील 1 लाख 14 हजार विद्यार्थ्यांचा मोहिमेत सहभाग अपेक्षित आहे. जास्तीत जास्त लसीकरण पूर्ण करणाऱ्या शाळांना बक्षीसाने गौरविले जाईल. –रविकांत आडसुळ, उपायुक्त, कोल्हापूर महापालिका