प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हय़ामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी कोरोनाच्या दक्षतेबाबत सरकारबरोबरच जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. त्यामुळेच इतर राज्यांच्या व देशांच्या तुलनेत कर्नाटक व भारतात कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे. याचबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. कोरोनाच्या लढाईबरोबरच आम्हाला कोलमडलेल्या आर्थिक घडीचीही दखल घ्यावी लागणार आहे. त्यासाठी उद्योग-व्यवसाय खुले करण्यात आले आहेत, अशी माहिती पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी सरकारी विश्रामधाम येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
जिल्हय़ामध्ये 107 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामधील बरेच रुग्ण बरे झाले आहेत. तबलिगी व अजमेरहून आलेल्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे जिल्हय़ामध्ये अधिक संख्या वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा प्रशासनाने अजमेरहून आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईनमध्ये ठेवले म्हणूनच मोठा धोका टळला. याबद्दल जिल्हा प्रशासनाचे त्यांनी कौतुक केले.
राज्यामध्ये मोठय़ा प्रमाणात संशयित व्यक्तींचे स्वॅब घेण्यात येत आहेत. ही संख्याही अधिक आहे. सरकारने सर्व ती तयारी पूर्ण केली आहे. बेंगळूरनंतर बेळगावातच सर्वात जास्त व्यक्तींची आतापर्यंत स्वॅबतपासणी करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या सर्व कामांना पुन्हा चालना देण्यात आली असून सर्व खासगी कामांबरोबरच सरकारी कामेही सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाबरोबरच विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्यासाठीच उद्योग- व्यवसायांबरोबरच बांधकाम क्षेत्रही खुले करण्यात आले आहे, अशी माहिती जगदीश शेट्टर यांनी दिली.
अमेरिकन-युरोपियन कंपन्यांना देण्यात येणार प्रोत्साहन
चीनमधील अनेक अमेरिकन आणि युरोपियन कंपन्या भारतामध्ये येण्यास तयार आहेत. त्या कंपन्यांना अधिक प्रोत्साहन देण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच स्पष्ट केले आहे. कर्नाटक सरकारही बाहेरून येणाऱया कंपन्यांसाठी प्रोत्साहन देणार असल्याचे शेट्टर यांनी सांगितले. कोणीही व्यवसाय सुरू करत असेल तर त्यांना तातडीने परवानगी दिली जाणार आहे. सरकार सर्व ते सहकार्य करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री सुरेश अंगडी, खासदार प्रभाकर कोरे, अण्णासाहेब जोल्ले, आमदार महांतेश कवटगीमठ, अनिल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी, जिल्हा आरोग्याधिकारी मुन्याळ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.