सीडीएस रावत यांचा सैनिकांना संदेश – आता उठून उभे राहण्याची वेळ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोनाविरोधी लढाईत देशाच्या लोकांसोबत भारतीय सैन्यही आता पूर्णपणे उतरणार आहे. विषाणूच्या दुसऱया लाटेमुळे उद्भवलेली स्थिती पाहता सरसेनापती (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी मंगळवारी सशस्त्र दलांना सज्ज होण्याचे आवाहन केले आहे. या परिस्थितीत मदत अत्यंत आवश्यक आहे. याचमुळे सशस्त्र दलांनी महामारीला तोंड देण्यासाठी नागरी प्रशासनाला मदत करावी असे रावत यांनी स्वतःच्या संदेशात म्हटले आहे.
सशस्त्र दलांसाठी हा उठून उभे राहण्याचा तसेच कालबद्ध पद्धतीने कोविड प्रतिबंधक सुविधा निर्माण करण्याप्रकरणी नागरी प्रशासनाला मदत करण्याची ही वेळ आहे. गणवेशधारी आमच्या स्त्राr-पुरुषांमध्ये प्रत्येक ठिकाणी सदैव अडथळे दूर करून पुढे जाण्यासाठी इच्छाशक्ती तसेच समर्पणाचा भाव असल्याचे रावत यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी महामारीच्या दुसऱया लाटेला तोंड देण्यासाठी सशस्त्र दलांकडून उचलण्यात येणाऱया विविध पावलांची माहिती दिल्यावर जनरल रावत यांचा हा संदेश आला आहे.
‘आम्ही करू शकतो आणि आम्ही करू. पुढे जाऊ अजून आम्हाला मोठा पल्ला गाठायचा आहे’ असे रावत यांनी म्हटले आहे. तिन्ही संरक्षण दले आणि संरक्षण मंत्रालयाचे विविध विभाग महामारीला तोंड देण्याच्या दृष्टीने अनेक पावले उचलत आहेत. भारतीय वायुदल रिकामे ऑक्सिजन टँकर आणि कंटेनरांना फिलिंग स्थानकांपर्यंत पोहोचविणे तसेच कोविड रुग्णालयांसाठी आवश्यक औषधे आणि उपकरणे पोहोचविण्याच्या कामात सामील आहे.
सैन्याने झोकली शक्ती
तिन्ही संरक्षण दले आता नागरी रुग्णालयांमध्येही सेवा बजावत आहेत. सैन्याच्या सर्व रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिल्लीतील बेस रुग्णालयाला पूर्णपणे कोविड रुग्णालयात रुपांतरित करण्यात आले आहे. सैन्याच्या सर्व कमांडच्या लोकल कमांडरांना अतिरिक्त बेड असल्यास तो कोरोना रुग्णांना उपलब्ध करण्याचा निर्देश देण्यात आला आहे. याचबरोबर बहुतांश वैद्यकीय कर्मचारीवर्गाला कोविड रुग्णालयात नागरी डॉक्टरांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आले आहे. युद्धाच्या काळात भारतीय सैन्य वॉर प्लॅन अंतर्गत नागरी रुग्णालयांची सेवा घेते. पण सध्या स्थिती याच्या उलट आहे. आता नागरी प्रशासनाला सैन्याच्या रुग्णालयांची सेवा घ्यावी लागत आहे.
संरक्षण मंत्र्यांचा मोठा निर्णय
कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी मोठा निर्णय घेत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांची वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी तात्पुरत्या भरती प्रक्रियेला मंजुरी दिली आहे. देशभरातील एकूण 51 ईसीएचएस पॉलिक्लिनिकमध्ये एक वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग सहाय्यक, फार्मासिस्ट, चालक आणि सुरक्षा रक्षकाची भरती केली जाणार आहे.