मंत्री निलेश काब्राल यांची माहिती : धारबांदोडा तालुक्यातील बैठकीत घेतला आढावा
प्रतिनिधी / धारबांदोडा
कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक तालुक्यात डॉक्टर्स व इतर आरोग्य कर्मचाऱयांचे विशेष पथक तयार करण्यात आले असून ते चोवीस तास कार्यरत राहणार आहे. आयुर्वेदिक डॉक्टर्स व आवश्यक कर्मचाऱयांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती वीजमंत्री निलेश काब्राल यांनी दिली.
कोरोनासंबंधी आढावा घेण्यासाठी धारबांदोडा तालुक्यात मंगळवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. स्थानिक आमदार तथा बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, धारबांदोडय़ाचे उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक, मामलेदार शर्मिला गांवकर, गटविकास अधिकारी सुर्याजी राणे, कुळेचे पोलीस निरीक्षक प्रज्योत फडते, कुडचडेचे निरीक्षक रवींद्र देसाई, पिळये आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. विल्सन फर्नांडिस, धारबांदोडाच्या सरपंच स्वाती तिळवे, साकोर्डा सरपंच जितेंद्र नाईक, मोले पंचायतीचे उपसरपंच सुशांत भगत, कुळे पंचायतीचे सरपंच गंगाराम लांबोर, पंचसदस्य विनायक गांवस, राजेश सांगोडकर व तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बैठकीला उपस्थित होते.
मंत्री काब्राल यांनी मागील आठवडय़ाभराच्या परिस्थितीचा आढावा घेतला. 7 जुलै ते 14 जुलै दरम्यान तालुक्यात 267 स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 238 जाणांचे तर 49 लोकांनी स्वेच्छेने तपासणी करुन घेतली होती. एकूण आठ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती डॉ. विल्सन फर्नांडिस यांनी दिली. मास्क न वापरल्याबद्दल कुळे पोलिसांकडून 221 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे निरीक्षक प्रज्योत फडते यांनी सांगितले.
धारबांदोडा तालुक्यात सहा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. सर्व मंडळे केवळ लहान मूर्ती आणून अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरी करणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम सादर न करता केवळ धार्मिक विधी करून गणेश विसर्जन करण्यात येणार असल्याचे मंडळांच्या अध्यक्षांनी सांगितले.
रात्रीच्यावेळी फिरणाऱयांवर कारवाई करा
कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणायचा असल्यास केवळ सरकारला दोष न देता प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पुढील बैठक 21 जुलै रोजी होणार असून पोलीस, तलाठी, पंचायत सचिव, उपजिल्हाधिकारी, मामलेदार यांच्याकडून अहवाल मागविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. जे लोक नियमांचे पालन करीत नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करा तसेच रात्री 10 ते पहाटे 5 वा. पर्यंत रस्त्यावर फिरणाऱयांना ताब्यात घेण्याची सूचनाही मंत्री काब्राल यांनी केली.
कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी तालुक्यातील पोलीस यंत्रणा व सरकारी कर्मचारी योग्य प्रकारे काम करीत आहे. शिवाय सरपंच व पंचायत मंडळेही खबरदारी घेत असल्यामुळे कोरोनाचा प्रसार जास्त प्रमाणात धारबांदोडा तालुक्यात झालेला नाही. सध्या कडक धोरण अवलंबवणे महत्त्वाचे आहे. तेव्हा प्रत्येकांने कोविडसंबंधी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन मंत्री दीपक पाऊसकर यांनी केले.
तालुक्यात कोविड निगा केंद्र सुरु कण्याची मागणी पंच सदस्य विनायक गांवस यांनी तालुक्यात किमान पन्नास खाटांचे कोविड निगा केंद्र सुरु करण्याची मागणी केली. सध्या पिळये येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर जास्त भार असून वाळपई मतदारसंघातील लोक याच इस्पितळात तपासणीसाठी येत असल्याने कर्मचाऱयांवर ताण वाढला आहे. गंगाराम लांबोर यांनी सब टेस्टींग कीट पंचायतीकडे सुपूर्द करण्याची मागणी केली. जितेंद्र नाईक यांनी पंचायत संचालनालयातर्फे पंचायतीना मास्क देण्याची मागणी केली तर सुशांत भगत यांनी बरकटे-मोले येथे सेनिटायझेशन करण्याची मागणी केली. खनिज वाहतूक सुरु असून ट्रक चालक मध्येच ट्रक उभे करून खाली उतरतात. अशा चालकांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अशा ट्रक चालकांवर पोलिसांकडून कडक कारवाई करतानाच दहा दिवसांसाठी त्यांची वाहतूक बंद करण्यात येईल, असे मंत्री काब्राल यांनी स्पष्ट केले. तालुका मुख्यालयाच्या नवीन इमारतीत कोविड निगा केंद्र उभारण्यासाठी सरकारकडे शिफारस करणार असल्याचे त्यांनी सांगितले.