ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे जिल्हयात कोरोना आणि अन्य आजाराच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी सर्व डॉक्टरांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली खासगी आणि शासकीय रुग्णालय व प्रयोगशाळांच्या डॉक्टरांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, जिल्हयातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खासगी आणि शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी कोरोना आणि अन्य आजाराच्या रुग्णांवर वेळेत उपचार करुन त्यांना मानसिक आधार देवून वैद्यकीय सेवेविषयी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा. तसेच ज्या खाजगी हॉस्पिटलमध्ये कोविडची तपासणी करण्याची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी कोवीडच्या रुग्णांना भरती करण्यासाठी आदेश द्यावेत.
तसेच शासकीय व खासगी प्रयोगशाळांमध्ये मोठया प्रमाणात कोविड-19 नमुने तपासणीसाठी येत असतात त्या नमुना तपासणीचा अहवाल वेळेत प्राप्त करुन द्यावेत. सर्वांनी प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.